|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मदनदादा भोसलेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला

मदनदादा भोसलेंच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला 

वाई : प्रतिनिधी

वाईखंडाळामहाबळेश्‍वर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार मदनदादा भोसले यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असून हॉकी स्टीकने गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. वाई शहरातील फुलेनगर येथे भर रस्त्यावर रात्री नऊ वाजता ही घटना घडली. सुदैवाने या हल्ल्यात मदनदादा भोसले कोणतीही दुखापत झालेली नाही.

महायुतीचे उमेदवार मदनदादा भोसले हे शहाबाग फाटा येथील सुरेश कोरडे यांच्या निवासस्थानाहून भाजपा कार्यालयाकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत किसन वीर कारखान्याचे माजी संचालक रोहिदास पिसाळ होते. फुलेनगर येथे आल्यानंतर मदनदादा भोसले यांनी त्यांचे कार्यकर्ते अमजद इनामदार यांच्या घराजवळ गाडी थांबवण्यास सांगितले. अमजद इनामदार यांचा फोन न लागल्यामुळे गाडीचे चालक शैलेश भोसले हे इनामदार यांना बोलवण्यासाठी गेले. अवघ्या काही क्षणातच दुचाकीवरून आलेल्या दोघा युवकांनी मदनदादा भोसले यांच्या युनोव्हा एमएच 11-333 गाडीशेजारी दुचाकी थांबवली. गाडीवरुन उतरून हल्लेखोरांनी हातातील स्टीकच्या साह्याने गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर लगेचच हल्लेखोरांनी शहाबाग फाट्याच्या दिशेने पळ काढला. या घटनेने गाडीच्या काचेचा चक्काचूर झाला.

चालक शैलेश भोसले यांनी आरडाओरडा केला. या घटनेची माहिती कळताच शहरातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उपस्थित समुदायाला शांत राहण्याचे आवाहन भोसले यांनी केले.

या हल्ल्याने कृपा करून कोणीही विचलीत होऊ नका. सर्वांनी शांतता बाळगा. गाडीत मी ज्या नेहमीच्या ठिकाणी बसतो, नेमक्या त्याच बाजूला हल्लेखोरांनी हा भ्याड हल्ला केला. ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम पाहता ज्या कोणी हे केले त्यांनी निचपणाचा कळस गाठला आहे. असल्या हल्ल्याला घाबरणारा मदन भोसले नव्हे. अशा प्रवृत्तींना वेळोवेळी सामोरा गेलो म्हणूनच आजपर्यंत टिकलो आहे. या घटनेने वाईच्या सुसंस्कृतपणाला चूड लावण्याचा प्रयत्न केलेला आहे; परंतु आम्ही कोणीही अशा प्रकाराला भीक घालणार नाही, विचलीत होणार नाही, असेही मदनदादा भोसले यांनी ठणकावले.

दरम्यान, घटनास्थळी प्रचंड गर्दी झाल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याही परिस्थितीत मदनदादा यांनी कार्यकर्त्यांना आपापल्या भागात जाण्याचे आवाहन करत वाहतूक खोळंबा होऊ देऊ नका, असे सांगितले.
या घटनेची नोंद करण्याचे काम वाई पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Related posts: