|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सिंधुदुर्गात सरासरी 65 टक्के मतदान

सिंधुदुर्गात सरासरी 65 टक्के मतदान 

23 उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद : पावसाचा मतदानावर परिणाम : 24 रोजी मतमोजणी

प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत जिल्हय़ातील प्रमुख नेत्यांचे, उमेदवारांचे झालेले पक्षांतर, एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी सत्तेतील मित्रपक्षांनी अपक्ष उमेदवारांना दिलेला उघड पाठिंबा, विरोधी पक्षांचे संपुष्टात आलेले अस्तित्व या पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया सोमवारी शांततेत पार पडली. जिल्हय़ात सरासरी 65 टक्के एवढे मतदान झाले. यामध्ये कणकवली मतदारसंघात ……. टक्के, सावंतवाडी मतदारसंघात …… टक्के तर कुडाळ मतदारसंघात ……. टक्के एवढे मतदान झाले. मतमोजणी 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

पाऊस आणि भात कापणी यामुळे प्रारंभी काहिसा मंदावलेला मतदानाचा वेग दुपारनंतर चांगलाच वाढला. संपूर्ण जिल्हय़ात सुरू असलेला वादळी पाऊस आणि भातपिकाचे झालेले नुकसान या पार्श्वभूमीवर सायंकाळी 4.30 पर्यंत पावसाने चांगल्यापैकी उघडीप दिल्याने ग्रामीण भागातील शेतकरी मतदाराने सकाळच्या सत्रात भात कापणीला प्राधान्य दिले. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदानाची प्रक्रिया खूपच मंद होती. मात्र सकाळी 11.30 नंतर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेने चांगल्यापैकी जोर पकडला. दुपारी तीन वाजेपर्यंत तीनही मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी जवळपास 50 टक्मयांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर सायंकाळी 5.45 पर्यंत कणकवली मतदारसंघात 61.35 टक्के, कुडाळ मतदारसंघात 58.43 टक्के, तर सावंतवाडी मतदारसंघात 59.37 टक्के एवढे मतदान झाले.

मशीनमधील बिघाडामुळे गोंधळाचे वातावरण

शांतता भंग करणारे असे अनुचित प्रकार कुठेही घडले नाही. नाही म्हणायला मालवणमध्ये एका मतदान केंद्रावर शिवसेना-भाजप या मित्रपक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. या तीनही मतदारसंघात निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडली असली, तरी व्ही. व्ही. पॅट तसेच ई. व्ही. एम. मशिनींमधील काही मतदान केंद्रांवर झालेल्या बिघाडामुळे काहीसे गेंधळाचे वातावरण निर्माण झाले. परंतु, प्रशासकीय यंत्रणेने धावपळ करून या तांत्रिक त्रुटी दूर केल्यामुळे ही मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. दोडामार्ग तालुक्यात सहा ठिकाणी अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्या. वेंगुर्ले तालुक्यात दोन ठिकाणी, सावंतवाडीत एक ठिकाणी, कुडाळ तालुक्यात चार ठिकाणी, देवगड तालुक्यात दोन ठिकाणी अशा अडचणी आल्या. मात्र त्याचा मतदान प्रक्रियेवर फारसा परिणाम झाला नाही.

उमेदवारांनी बजावला मतदानाचा हक्क

राणे कुटुंबियांनी वरवडे मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी खासदार नारायण राणे, उमेदवार आमदार नीतेश राणे, माजी खासदार निलेश राणे, सौ. निलिमा राणे व कुटुंबियांचा यात समावेश होता. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शहरातील तालुका स्कूल मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केले. कुडाळ मतदारसंघातील विद्यमान आमदार व उमेदवार आमदार वैभव नाईक यांना आपल्या मतदारसंघात स्वत:साठी मतदान करता नाही. त्यांनी कणकवली येथील शाळा नं. 5 या मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी मतदारसंघात निवडणूक रिंगणात उतरलेल्या राजन तेली यांना देखील स्वत:साठी मतदान करता आले नाही. त्यांनी देखील कणकवली येथे सायंकाळी उशिरा सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. राणेंची साथ सोडत शिवसेनेचा भगवा हाती घेतलेल्या उमेदवार सतीश सावंत यांनी कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील केंद्रावर मतदान केले. कुडाळ मतदारसंघातील भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांनी पिंगुळी येथे मतदानाचा हक्क बजावला.

मतदान प्रक्रियेवर पावसाचे सावट

मतदान प्रक्रियेवर गेले काही दिवस कोसळणाऱया पावसाचे सावट मात्र निश्चिपणे होते. या वादळी पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची चिंता शेतकऱयाला होती आणि या चिंतेचे सावट आजच्या या मतदान प्रक्रियेत निश्चितपणे दिसत होते. मात्र अशाही परिस्थितीत पावसाने उघडीप घेतल्यानंतर शेतकऱयांनी शेतीची कामे आटोपत मतदानाचा हक्क बजावला.

कुडाळ मतदारसंघातील सखी मतदान केंद्रातील अनास्था उघड

कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघातील सखी मतदान केंद्रे ही सजवून सुशोभित करण्यात आल्याने ती मतदारांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली होती. कलमठ केंद्रावर तर सेल्फी पॉईंंट तयार करण्यात आला होता. मात्र या पार्श्वभूमीवर कुडाळ मतदारसंघातील कुडाळ येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील सखी मतदान केंद्रावर मात्र पूर्णत: अनास्था दिसत होती. या केंद्रावर सावंतवाडी आणि कणकवली केंद्राप्रमाणे कसल्याही प्रकारची सजावट दिसत नव्हती आणि उत्साह देखील दिसत नव्हता.

जिल्हाधिकाऱयांकडून समज

निवडणूक आयोगाचे प्राधिकार पत्र असलेल्या पत्रकार व माहिती अधिकारी यांना कुडाळ येथील सखी मतदान केंद्रावर माहिती घेण्यास नकार देण्यात आला. बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला पोलिसांनी प्राधिकार पत्रे असतानाही मतदान केंद्रात जाण्यास मनाई केली. केंद्राध्यक्षांनी याबाबतची दखल घेण्याकडे कानाडोळा केला. बराचवेळ वाट पाहिल्यानंतर जिल्हाधिकाऱयांचे मोबाईलवरून याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर काही वेळातच जिल्हाधिकाऱयांनी या केंद्राला भेट देत संबंधितांना समज दिली.

Related posts: