|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पुरात अडकलेल्या मजूर कुटुंबाची सुटका

पुरात अडकलेल्या मजूर कुटुंबाची सुटका 

फोंडा

परतीच्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून फोंडा तालुक्यात जोर धरला असून सोमवार दुपारनंतर कोसळलेल्या जोरदार सरींनी फोंडा शहर व आसपासच्या भागात दाणादाण उडवून दिली. नागझर कुर्टी व खांडेपार येथे काही घरांमध्ये व दुकानमध्ये पाणी घुसले. शहरातून वाहणाऱया मुख्य नाल्याला पूर आल्याने पाणी रस्त्यापर्यंत पोचले होते. वारखंडे येथे नाल्याच्या बाजूला असलेल्या  व पुरात अडकलेल्या एका घरातील मजूर कुटुंबाची अग्नीशामक दलाच्या मदतीने सुटका करण्यात आली.

सोमवारी सायंकाळी 4 वा. पासून पावसाने जोर धरला होता. तीन ते चार तास पावसाचा जोर कायम होता. सायंकाळी कामावरुन घरी परतणारे कामगार व नोकरदार बसस्थानक व दुकानांच्या आडोशाला आसरा घेत पाऊस थांबण्याच्या प्रतिक्षेत दिसत होते. शहरातील बरेच रस्ते पाण्याखाली गेले. फोंडय़ातून वाहणाऱया मुख्य नाल्याचा प्रवाह वाढल्याने नागझर – कुर्टी येथील कुर्टी-बेळगाव बगलरस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांमध्ये व निवासी इमारत प्रकल्पाच्या तळमजल्यावरील सदनिकांमध्ये पाणी शिरले. येथील महादेव मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. वारखंडे येथील शिमगो मांडापर्यंत नाल्याचे पाणी पोचले होते. बाजूला असलेल्या एक दोन घरांमध्येही पाणी घुसले. याठिकाणी वस्तीला असलेल्या एका मजूर कुटुंबाच्या घराला पुराचा वेढा पडल्याने आंतमध्ये अडकलेल्या साधारण दहा कुटुंब सदस्यांची अग्नीशामक दलाने सुटका केली. त्यात काही लहान मुलांचाही समावेश होता.

पावसाच्या पाण्याचा असाच तडाखा खांडेपार-ओपा जंक्शनवरील संदीप पारकर यांच्या घरवजा दुकानाला बसला. शेजारील निलेश पर्वतकर यांच्या घरातही पाणी घुसले. गोवा बेळगाव महामार्गाचे चौपदरीकरण करताना येथील नाला बुजविण्यात आल्याने पाण्याच्या निचऱयाची दिशाच बदलली गेली आहे. त्यामुळे वरच्या बाजुने असलेल्या पाचमे, केरये, आंगडी व वाघर्मे रस्त्याच्या बाजूने येणाऱया पाण्याच्या निचऱयाचा मार्गच बंद झाला आहे. शिवाय येथील गटारावर काही गाडे उभारल्याने पावसाच्या पाणी थेट आपल्या घरात व दुकानात घुसल्याची माहिती संदीप पारकर यांनी दिली.   

Related posts: