|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » दोन मंदिरांमधील चार तोळे सोने लंपास

दोन मंदिरांमधील चार तोळे सोने लंपास 

वार्ताहर/ हिंडलगा

ग्रामीण भागात चोरटय़ांनी पुन्हा उच्छाद मांडला असून रविवारी रात्री आंबेवाडी आणि गोजगा येथील ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरांच्या दरवाजाचे कुलूप तोडून मूर्तीवरील सोन्याचे दागिने लांबविले आहेत. दोन्ही मंदिरातील सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने एकाच रात्रीत लांबविल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

आंबेवाडी येथील लक्ष्मी गल्लीतील श्री लक्ष्मी मंदिराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी मूर्तीवरील मंगळसूत्र, कर्णफुले, नथ असे एकूण दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तर गोजगा येथील लक्ष्मी मंदिरातील सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, नेकलेस असे एकूण अडीच तोळय़ाचे दागिने चोरटय़ांनी लंपास केले. दोन्ही मंदिरातील एकूण सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरी झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी मंदिराचे पुजारी साफसफाईसाठी मंदिरात गेल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर काकती पोलिसांना घटनेची माहिती देऊन पाचारण करण्यात आले. श्वानपथक व ठसेतज्ञांसह दाखल झालेल्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून श्वानपथकाच्या साहाय्याने चोरटय़ांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. पण श्वान काही अंतरावरच जाऊन घुटमळले. या वेळी देवस्थान पंच कमिटी, ग्राम पंचायत सदस्य, पुजारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: