|Friday, January 24, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » महिला आघाडी गृहोद्योगाची उत्पादने लोकप्रिय व्हावीत

महिला आघाडी गृहोद्योगाची उत्पादने लोकप्रिय व्हावीत 

किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : महिला आघाडीच्या महिला गृहोद्योगाचा शुभारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

लघु उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न महिला आघाडीच्या माध्यमातून केला जात आहे. महिला गृहोद्योगाची सुरुवात झाली असून हा उद्योग ब्रँड बनविण्याचे प्रयत्न व्हावेत आणि ती उत्पादने लोकप्रिय व्हावीत, असे विचार तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केले.

महिला आघाडीच्या महिला गृहोद्योगाच्या उद्घाटन सोहळय़ाप्रसंगी किरण ठाकुर बोलत होते. महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हॉटेल, सोसायटी, झुणका-भाकर केंद्र या यशस्वी उद्योगांनंतर महिला गृहोद्योगाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रारंभी किरण ठाकुर यांच्या हस्ते फीत कापून उद्योगाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी प्रास्ताविक करून उद्योगाची माहिती दिली.

यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले, उद्योग करताना स्वच्छता, तत्परता आणि उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा, असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी महापौर सरिता पाटील यांनी महिला आघाडीच्या कार्याचा मागोवा घेत किरण ठाकुर यांचे सहकार्य मोलाचे ठरत असल्याचे नमूद केले.

यावेळी प्रिया कुडची, भाग्यश्री जाधव, राजश्री बांबुळकर, श्रद्धा मंडोळकर, शेवंता भोसले, स्वामिनी पाटील, दीपा मुतगेकर, वर्षा वाडेकर, अनुपमा कोकणे, अर्चना देसाई तसेच महिला आघाडी सोसायटी, महिला झुणका-भाकर केंद्र, महिला आघाडी हॉटेल, महिला गृहोद्योग यामध्ये कार्यरत असणाऱया महिला सदस्या उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वारकानाथ उरणकर यांनी केले. सरिता पाटील यांनी आभार मानले.

बॉक्स

उत्पादने उपलब्ध

महिला गृहोद्योगाच्या माध्यमातून निवडक उत्तम दर्जाचे फराळ, सांडगे, पापड, लोणची उपलब्ध झाली आहेत. काकतीवेस रोड येथील महिला गृहोद्योगाच्या स्टोअर्समध्ये ही उत्पादने उपलब्ध आहेत.

Related posts: