|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोमेंतोने सोनसडा प्रकल्प ताबा सोडावा

फोमेंतोने सोनसडा प्रकल्प ताबा सोडावा 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सूचना

प्रतिनिधी/ पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी झालेल्या एका महत्वपूर्ण उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मडगावात कचरा प्रक्रियेसाठी दोन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी फोमेंतो व मडगाव पालिका वाद प्रकरणी फोमेंतो कंपनीला गोव्याच्या हितासाठी स्वत: या प्रकल्पापासून दूर जावे, गोवा सरकार या कंपनीला रु. सहा कोटी पर्यंतची थकबाकी देण्यास राजी असल्याचे स्पष्ट केले.

मडगावातील सोनसडा कचरा प्रक्रिया प्रकल्पातून फोमेंतो-मडगाव पालिका यांच्या दरम्यानच्या वादामुळे मडगावात कचऱयाचे ढीग वाढत आहेत. त्याचा जनतेवर विपरित परिणात होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात उच्चाधिकार समितीची बैठक घेतली. बैठकीस कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो, पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, विजय सरदेसाई, मडगावच्या नगराध्यक्ष बबिता प्रभुदेसाई, विज्ञान तंत्रज्ञान संचालक लेविन्सन मार्टिन्स, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिव शर्मिला मोंतेरो, तसेच राज्याचे मुख्य सचिव परिमल राय आदी उपस्थित होते.

फोमेंतोकडे चर्चा करणार

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की सर्वांचे एकमत झाले आहे की मडगावातील कचरा समस्या त्वरित सोडविण्यात यावी. यासाठी आपण स्वत: फोमेंतो कंपनीकडे चर्चा करणार आहे. त्यांना आपण विनंती करतो की त्यांनी सोनसडय़ावरील हक्क सोडून द्यावा. त्यांनी जरी 12 कोटी रु. चा दावा केला असला तरीही गोवा सरकार 6 कोटी रु. ची थकबाकी देण्यास राजी आहे. फोमेंतो कंपनीचे तिंबले यांच्याशी आपण स्व<त: चर्चा करीन. आपल्याला आशा आहे व खात्री वाटते की सोनसडा कचरा प्रश्नी निश्चितच तोडगा निघेल. त्यासाठी तिंबले आम्हाला सहकार्य करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मडगावात लवकरच दोन प्रकल्प उभारणार

मडगावात गोवा सरकार कचरा प्रक्रियेचे दोन प्रकल्प उभारणार आहेत. त्यासाठी सारी प्रक्रिया पूर्ण करून दीड ते दोन महिन्यात हे प्रकल्प उभारले जातील. वर्षभरात सोनसडावरील कचरा संपुष्टात आणण्याचा सरकारचा इरादा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. सोनसडा परिसरात 500 चौ. मी. क्षेत्रफळात दोन कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारले जातील. मडगाव फातोर्डा व आसपासच्या नागरिकांनी आपल्याकडील कचरा एकत्रित न करता वेगवेगळा करून टाकावा, जेणेकरून पुढे प्रक्रिया करणे शक्य होईल.

सोनसडा प्रकरण न्यायालयात आहे. आमचे म्हणणे आहे फोमेंतो व आमचे दोघांचे उद्दीष्ट एकच आहे. तेव्हा त्यांनी आपला दावा सोडावा. राज्य सरकार न्यायालयाबाहेर जाऊन यावर तोडगा काढण्यास तयार आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

पणजीवरही लवकरच तोडगा

 बांयगिणी कचरा प्रक्रिया प्रकल्पावर पुढील 10 दिवसात तोडगा काढण्याचा आपला इरादा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. त्यासाठी आपण बाबूश मोन्सेरात आणि पांडुरंग मडकईकर या दोघांशीही चर्चा केलेली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Related posts: