|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » चेंबूर हिंसाचार प्रकरणी 33 जण अटकेत

चेंबूर हिंसाचार प्रकरणी 33 जण अटकेत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

चेंबूरमधील बेपत्ता मुलीचा पोलिसांनी शोध न घेतल्याने तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या हिंसेप्रकरणी पोलिसांनी आज 33 जणांना अटक केली आहे. तर 200 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चेंबूरच्या ठक्कर बाप्पा कॉलनीत राहणाऱया पंचाराम रिठाडिया (40) यांची 17 वषीय मुलगी सुमारे सात महिन्यांपूर्वी बेपत्ता झाली. याच परिसरात राहणाऱया एका तरुणाने तिचे अपहरण केल्याचा पंचाराम यांना संशय होता. याबाबत त्यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. अनेक दिवस उलटूनही या मुलीचा शोध लागला नव्हता. त्यातच आरोपीचे कुटुंबीय धमकी देत असल्याचा आरोप पंचाराम यांनी केला होता. रोजच्या त्रासाला कंटाळून पंचाराम यांनी 13 ऑक्टोबरला रात्री टिळकनगर रेल्वे स्थानक परिसरात लोकलखाली उडी घेत आत्महत्या केली होती.

या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाने मंगळवारी कुर्ला-चेंबूर परिसरात जोरदार आंदोलन केले. तसेच अंत्ययात्रे दरम्यान संतप्त जनसमुदायाने पोलिसांवर दगडफेक केली होती. वाहनांची तोडफोड करीत या जमावाने चेंबूर येथील सायन-पनवेल महामार्गावर रास्ता रोकोही केला. आंदोलनकर्ते अधिकच हिंसक बनत असल्याचे पाहून अतिरिक्त कुमक मागवून पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला होता.

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसान, घातक शस्त्रांनी मारहाण अशा कलमांनुसार अंदाजे 200 आंदोलकांवर चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 33 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

 

Related posts: