|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईच्या निर्णयावर मुख्यमंत्री संतप्त

म्हादईच्या निर्णयावर मुख्यमंत्री संतप्त 

म्हादई आम्हाला माते समान, तडजोड स्वीकारणार नाही

प्रतिनिधी/ पणजी

म्हादई प्रश्नी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे संतप्त बनले असून म्हादई ही आम्हाला माते समान आहे आणि त्याबाबतीत कोणतीही तडजोड स्वीकारणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. गोवा सरकारला विश्वासात घेतल्याशिवाय पर्यावरण खाते कोणताही थेट निर्णय घेऊ शकत नाही आणि गरज पडल्यास गोवा सरकार त्याविरुद्ध न्यायालयातही जाण्यास मागे राहाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

म्हादई प्रश्नी प्रकाश जावडेकर यांच्या ट्विटरवरील निवेदनानंतर गोव्यात प्रचंड खळबळ माजली व त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे जागतिक पर्यटन मेळाव्यास गेले होते. रात्री उशिरा ते पणजीत परतल्यानंतर त्यांनी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर त्यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी नेमके काय सांगितले हे कळू शकले नाही.

तरुण भारतशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, म्हादई प्रश्नी आपण कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. म्हादई ही आम्हाला माते समान आहे, गोव्याच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे आणि त्यासाठी वाट्टेल ते करण्याची आमची तयारी आहे. आम्ही गरज पडल्यास न्यायालयात जाऊ, केंद्राने नेमका कोणता निर्णय घेतला याबाबतची अधिकृत कोणतीही माहिती आम्हाला उपलब्ध झालेली नाही. केंद्राकडून अधिकृत माहिती आल्यानंतरच पुढे कोणता निर्णय घ्यायचा हे ठरविले जाईल.

मुख्यमंत्री दिल्लीला जाणार?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना अंधारात ठेवून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळावर प्रचंड दबाव आणून म्हादई नदीवर कळसा-भांडुरा येथे धरण प्रकल्प उभारण्यास कर्नाटकला अत्यंत घाईघाईने आणि कपटनितीचा अवलंब करुन गुपचूपपणे परवानगी दिली. यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आता दिल्लीला धडक देणार असून गरज पडल्यास ते पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अन्य काही केंद्रीय मंत्र्यांनाही भेटणार आहेत.

श्रीपादभाऊ नाईक यांनाही ठेवले अंधारात

दरम्यान, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधला असता या निर्णयाबाबत तेही अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. आपल्याला नेमकी या निर्णयाची कल्पना नाही असे ते म्हणाले. आपण याबाबत संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी तरुण भारतला सांगितले.

Related posts: