|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » एटीएम अदलाबदलीद्वारे गंडा घालणाऱया टोळीला अटक

एटीएम अदलाबदलीद्वारे गंडा घालणाऱया टोळीला अटक 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

एटीएम कार्डची अदलाबदल करून रत्नागिरी जिल्हय़ातील नागरिकांची फसवणूक करणाऱया टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पर्दापाश केला. वृद्ध, अपंगांना पैसे काढण्यास मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे एटीएम कार्ड ताब्यात घेऊन त्यांना बनावट कार्ड देऊन फसवणूक केली जात होती. या प्रकरणी पाच जणांच्या टोळक्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांच्या रोख रकमेसह 5 लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी केलेल्या कारवाईत सागर देविदास अंभोरे (25, रा. बाबासाहेब आंबेडकरनगर उल्हासनगर, ठाणे), महेश पांडुरंग धनगर (31, रा. ब्राम्हणपाड, विठ्ठलमंदिराच्या बाजुला विठ्ठलवाडी, ठाणे) गणेश बाळचंद्र लोडते (21, रा. रमाबाई आंबेडकर नगर उल्हासनगर, कल्याण), रोहित ओमशंकर मधुकर शर्मा (25, रा. संत ज्ञानेश्वरनगर, उटी सेक्शन मंदिराजवळ, उल्हासनगर), विकी राजू वानखेडे (वय 19, रा. विठ्ठलवाडी पोलीस चौकीच्या बाजूला, सुमन बिल्डींग ठाणे) यांना अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हय़ात अनेक ठिकाणी एटीएम कार्ड अदलाबदल फसवणूक झाल्याची तक्रारी विविध पोलिसस्थानकात दाखल झाल्या आहेत. या गुन्हय़ांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांनी एक पथक तयार केले होते. या चौकशीत मिळालेलया माहितीनुसार काही जणांच्या संशयित हालचालींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले होते.

रत्नागिरी शहरात अशा प्रकारे गंडा घालणारी टोळी येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानुसार  हातखंबा येथे पोलिसांच्या पथकांने सापळा लावला होता. यावेळी पाच संशयास्पद आरोपींची चौकशी पोलिसांनी केली. चौकशीत या टोळीचे कारनामे उघड झाल्यातंर त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या टोळीने खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीत अशाप्रकारचे गुन्हे तसेच राज्यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे तसेच गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या टोळीकडून 2, 34, 400 रुपयांची रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट, वेगवेगळय़ा बँकांची एटीएम कार्ड मिळून आली आहेत. तसेच या गुन्हय़ांसाठी वापरलेली स्वीफ्ट कार असा एकूण 5,23,220 रुपयांचा मुदद्देमाल हस्तगत केलेला आहे. सर्व आरोपींना पुढील तपासाकरता रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, संदीप कोळंबेकर, सुभाष भागणे, पोलीस नाईक नितीन डोमणे, विजय आंबेकर, सागर साळवी, दत्ता कांबळे, तसेच सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष माने, शांताराम झोरे, राजेश भुजबळराव, प्रशांत बोरकर, अरूण चाळके, अमोल भोसले यांनी केली आहे.

Related posts: