|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » क्रिडा » बीसीसीआयशिवाय आयसीसी काय आहे?

बीसीसीआयशिवाय आयसीसी काय आहे? 

बीसीसीआयचे नवे खजिनदार अरुण धुमल यांचा खडा सवाल

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

‘आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीत भारताला सन्मानाचे स्थान नाही, ही बाब भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे नवे खजिनदार अरुण धुमल यांना अजिबात रुचलेली नसून बीसीसीआयशिवाय आयसीसी काय आहे’, असा खडा सवाल त्यांनी गुरुवारी केला. आयसीसीने नवी कार्यकारिणी जाहीर करताना त्यातून भारताला वगळण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर धुमल बोलत होते. सौरभ गांगुली यांच्या अध्यक्षतेखाली पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱया दिवशी त्यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधला.

‘2023 ते 2031 या कालावधीतील फ्यूचर टूर्स प्रोग्रॅम अंतर्गत बीसीसीआय आयसीसीच्या कार्यकारिणीत नाही. आयसीसीच्या नव्या प्रस्तावित रचनेनुसार टी-20 विश्वचषक स्पर्धा दरवर्षी व वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा तीन वर्षातून एकदा खेळवली जाणे अपेक्षित आहे. अर्थातच, बीसीसीआयचे सहकार्य आयसीसीला घ्यावेच लागेल’, असे धुमल यांनी येथे नमूद केले.

अनाठायी खर्च कमी करत तो निधी प्रथमश्रेणी क्रिकेटपटूंची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वापरला जाईल, असे ते म्हणाले. धुमल हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकुर यांचे कनिष्ठ बंधू असून अलीकडील कालावधीत कायदेशीर बाबींसाठी जो प्रचंड खर्च केला गेला, त्याबद्दलही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 2017 पासून मंडळाचा कारभार सर्वोच्च न्यायालय नियुक्त प्रशासक समितीच्या माध्यमातूनच हाकला गेला. बुधवारी या प्रशासक समितीचा 33 महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला.

Related posts: