|Monday, December 9, 2019
You are here: Home » क्रिडा » कर्नाटक-तामिळनाडू यांच्यात आज फायनल

कर्नाटक-तामिळनाडू यांच्यात आज फायनल 

विजय हजारे चषक स्पर्धा : बेळगावच्या रोनित मोरेचा कर्नाटक संघात समावेश

बेंगळूर / वृत्तसंस्था

विजय हजारे चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज कर्नाटक-तामिळनाडू आमनेसामने भिडतील, त्यावेळी मयांक अगरवाल, रविचंद्रन अश्विन व केएल राहुल या भारतीय संघातील खेळाडूंवर मुख्य फोकस असणार आहे. मनीष पांडेच्या नेतृत्वाखालील कर्नाटक संघाने बाद फेरीत सहज विजय संपादन करत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली तर तामिळनाडूचा संघ उपांत्यपूर्व फेरीत पावसाच्या व्यत्ययामुळे पंजाबविरुद्ध पुढे चाल मिळाल्याने यशस्वी ठरला. पुढे युवा खेळाडू एम. शाहरुख खानने गुजरातविरुद्ध उपांत्य लढतीत विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

कागदावर कर्नाटक व तामिळनाडू या दोन्ही संघांची ताकद बरीच समसमान भासते. दमदार फलंदाजी व अव्वल गोलंदाज ही उभय संघांची मजबुती आहे. पण, अनुभवी रविचंद्रन अश्विन तामिळनाडू संघात दाखल झाल्याने त्यांना अर्थातच जणू हत्तीचे बळ लाभले आहे.

आजच्या लढतीत दोन्ही संघांची गोलंदाजी कशी होईल, यावर निकाल अवलंबून असेल, असे संकेत आहेत. दोन्ही संघ फलंदाजीत मजबूत आहेत. त्यामुळे, गोलंदाजांचाच येथे खऱया अर्थाने कस लागणार आहे. सध्या कसोटी संघातून बाहेर पडलेला सलामीवीर केएल राहुल (10 सामन्यात 546 धावा) व त्याचा सहकारी सलामीवीर देवदत्त पडिक्कल (10 सामन्यात 598 धावा) यांच्यावर कर्नाटकची येथे भिस्त असेल. कर्णधार मनीष पांडे हा देखील उत्तम बहरात असून मयांक अगरवाल व करुण नायर यांच्या उपलब्धतेमुळे कर्नाटक मजबूत असेल.

दुसरीकडे, तामिळनाडू संघातही बाबा अपराजित (480 धावा), अभिनव मुकूंद (440 धावा) व मुरली विजय यांचा समावेश आहे. कर्णधार दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून बराच नावारुपाला आला असून अंतिम फेरीतही निर्णायक योगदान देण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. अष्टपैलू विजय शंकर व नवोदित शाहरुख खान यांनी बुधवारी झालेल्या लढतीत संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.

कर्नाटकच्या व्ही. कौशिकने छत्तीसगडविरुद्ध 4 बळी घेत उपांत्य लढतीत वरचष्मा प्रस्थापित करुन दिला तर मध्यमगती गोलंदाज अभिमन्यू मिथुन, प्रसिद्ध कृष्णासह फिरकीपटू के. गौतम, श्रेयस गोपाल, प्रवीण दुबे यांनीही दमदार मारा केला होता. त्यामुळे, येथे तामिळनाडूच्या फलंदाजांविरुद्ध त्यांची जुगलबंदी रंगेल, हे जवळपास निश्चित मानले जाते.

चिन्नास्वामी स्टेडियमच्या सीमारेषा तुलनेने नजीक असल्याने येथे राहुल, मयांक व अन्य फलंदाजांना रोखणे आव्हानात्मक असेल, याची स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन व लेगस्पिनर मुरुगन अश्विन यांना उत्तम जाणीव आहे. तामिळनाडूच्या मध्यमगती गोलंदाजीची धुरा टी. नटराजन, एम. मोहम्मद व के. विघ्नेश यांच्यावर असणार आहे.

मागील दोन हंगामात तामिळनाडूने बरीच निराशा केली असून दुसरीकडे, कर्नाटकला 2018-19 हंगामात संमिश्र कामगिरीवरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे, येथे जेतेपदाने जोरदार सुरुवात करणे, हे दोन्ही संघांचे लक्ष्य असणार आहे.

संभाव्य संघ

कर्नाटक : मनीष पांडे (कर्णधार), केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, मयांक अगरवाल, करुण नायर, पवन देशपांडे, के. गौतम, श्रेयस गोपाल, एस. शरथ (यष्टीरक्षक), अभिमन्यू मिथुन, व्ही. कौशिक, प्रसिद्ध कृष्णा, रोनित मोरे, प्रवीण दुबे, जे. सुचिथ, अभिषेक रेड्डी.

तामिळनाडू : दिनेश कार्तिक (कर्णधार), अभिनव मुकूंद, मुरली विजय, बी. अपराजित, विजय शंकर, एमएस वॉशिंग्टन सुंदर, एम. शाहरुख खान, रविचंद्रन अश्विन, एम. मोहम्मद, टी. नटराजन, के. विघ्नेश, मुरुगन अश्विन, एन. जगदीशन (यष्टीरक्षक), अभिषेक तन्वर, सी. हरी निशांथ, जे. कौशिक.

सामन्याची वेळ : सकाळी 9 पासून.

Related posts: