|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट कोहलीला टी-20 मालिकेतून विश्रांती

विराट कोहलीला टी-20 मालिकेतून विश्रांती 

बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी संघाची घोषणा, शिवम दुबेला पदार्पणाची संधी

मुंबई / वृत्तसंस्था

बांगलादेशविरुद्ध होणाऱया आगामी 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली तर मुंबईच्या शिवम दुबेला पदार्पणाची संधी लाभली आहे. शिवम दुबेने अलीकडील कालावधीत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण योगदान दिले होते. त्याची पोचपावती त्याला येथे मिळाली आहे. उदयोन्मुख संजू सॅमसन व लेगस्पिनर यजुवेंद्र चहल यांचेही या टी-20 संघात पुनरागमन झाले. विराटच्या गैरहजेरीत रोहित शर्मा टी-20 मालिकेत नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे.

एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने यावेळी बांगलादेशविरुद्ध कसोटी संघनिवड करताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3-0 असा क्लीन स्वीप करणारा आपला मागील संघच कायम ठेवला आहे. भारत-बांगलादेश यांच्यातील मालिकेला दि. 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दुल ठाकुर टी-20 संघात नव्याने दाखल झाला आहे तर अष्टपैलू रविंद्र जडेजाला विश्रांती दिली गेली आहे. दिल्लीचा जलद गोलंदाज नवदीप सैनीला तंदुरुस्तीच्या समस्येमुळे वगळले गेले आहे.

‘दुखापतीतून सावरत असलेला अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार पुढील मालिकेत (विंडीजविरुद्ध) पुनरागमन करु शकेल तर जसप्रित बुमराहला संघात परतण्यासाठी अद्याप बराच कालावधी लागणार आहे’, असे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी येथे नमूद केले.

बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी टी-20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पंडय़ा, यजुवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर.

बांगलादेशविरुद्ध मालिकेसाठी कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत.

भारत-बांगलादेश मालिकेची रुपरेषा

तारीख / सामना / वेळ / ठिकाण

3 नोव्हेंबर / पहिली टी-20 / सायं. 7 वा. / नवी दिल्ली

7 नोव्हेंबर / दुसरी टी-20 / सायं. 7 वा. / राजकोट

10 नोव्हेंबर / तिसरी टी-20 / सायं. 7 वा. / नागपूर

14 ते 18 नोव्हेंबर / पहिली कसोटी / सकाळी 9.30 पा./ इंदोर

22 ते 26 नोव्हेंबर / दुसरी कसोटी / सकाळी 9.30 पा. / कोलकाता

बांगलादेशी खेळाडूंचा बहिष्कार मागे

ढाका : स्टार अष्टपैलू शकीब-उल-हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशी खेळाडूंनी मानधन व अन्य भत्त्यांवरुन उगारलेली बहिष्काराची तलवार अखेर म्यान केली असून यामुळे त्यांच्या भारत दौऱयावरुन निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळ व खेळाडू यांच्यात दोन तास चर्चा झाली आणि मंडळाने खेळाडूंना त्यांच्या मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे अभिवचन दिल्यानंतर खेळाडूंनी आपला बहिष्कार मागे घेतला. या संघातील खेळाडू आता शुक्रवारी सुरु होणाऱया शिबिरात दाखल होतील.

खेळाडू व बांगलादेशी मंडळात बुधवारी मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. खेळाडूंच्या वतीने कर्णधार शकीब हसनसह मुश्फिकूर रहीम, महमुदुल्लाह, तमिम इक्बाल आदींनी चर्चेत भाग घेतला. खेळाडूंनी आपल्या आधीच्या मागण्यात आणखी भर घालत बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या उत्पन्नात वाटा मिळावा आणि महिला खेळाडूंनाही समसमान मानधन दिले जावे, अशी मागणी केली. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नझमूल हसन यांनी या दोन मागण्यांबाबत काहीही अभिवचन दिले नाही. पण, त्यापूर्वी केलेल्या 11 मागण्या मान्य केल्या.

बांगलादेशी खेळाडूंनी डीपीएल ट्रान्स्फर, बीपीएल प्रँचायझी मॉडेल, क्लब ट्रान्स्फर पद्धतीला मान्यता, मध्यवर्ती करारात वाढ, अधिक खेळाडूंना संधी, प्रथमश्रेणी मानधनात वाढ आदी मागण्या केल्या होत्या.

 

 

Related posts: