|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राज्यात पूरसदृष्य स्थिती

राज्यात पूरसदृष्य स्थिती 

तब्बल 36 तास नॉनस्टॉप पाऊस, दिवाळीच्या पूर्वसंध्येला वादळी पावसाची शक्यता

प्रतिनिधी/ पणजी

राज्याला पावसाने गुरुवारी पहाटेपासूनच झोडपून काढले. सर्वत्र पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला राज्यात सर्वत्र वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आगामी 24 तासात राज्यात सर्वत्र वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पावसामुळे शेती बागायतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर दिवाळी उत्सावावर विरजण पडलेले आहे. आगामी दोन दिवसांमध्ये पर्यटकांनी गोव्यात येऊ नये, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.

राज्याला बुधवारी सायंकाळपासून पावसाने झोडपून काढलेले आहे. गेले 36 तास राज्यात सर्वत्र नॉनस्टॉप पाऊस चालू आहे. राज्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झालेली आहेत. ऑक्टोबरच्या अखेरीस राज्यात तुफानी व मुसळधार पाऊस असा पहिल्यांदाच प्रसंग जनतेला अनुभवायला मिळत आहे. मान्सुनोत्तर पावसाने संपूर्ण गोव्यात गेले कित्येक दिवस धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कित्येक भागात 20 इंचा पेक्षाही जास्त पाऊस झालेला आहे. आगामी 24 तासांत राज्यात मुसळधार पाऊस वादळी वाऱयासह पडेल असा इशारा पणजी वेधशाळेने दिला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून तो गाव्याच्या दिशेने सरकत आहे. हवामान खात्याने गेल्या चार दिवसांपूर्वीच मच्छीमारांना खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मांडवी नदीच्या पात्रात गुरुवारी सर्वत्र मच्छीमारी ट्रॉलर्स विखुरलेल्याचे चित्र दिसत होते. मच्छीमारी व्यवसायावर देखील वादळी पावसाचा गंभीर परिणाम झालेला आहे.

वास्कोला झोडपले, तब्बल 6.5 इंच

पणजीत 4.5 इंच पाऊस

ऑक्टोबरच्या अखेरीस एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पाऊस कधीच पडला नाही. परंतु सध्या कोसळत असलेल्या पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. मुरगाव मध्ये 6.5 इंच एवढा जोरदार पाऊस पडलेला आहे. पणजीत 4.5 इंच पाऊस झालेला आहे. सांगेमध्ये आतापर्यंत 18 इंच पाऊस पडलेला आहे. केपेमध्ये 14 इंच, मुरगाव 15 इंच, दाबोळी 11 इंच, काणकोणमध्ये आतापर्यंत 20.5 इंच पाऊस पडलेला आहे. वाळपईत 13 इंच, सांखळी 16 इंच, जुने गोवे 10 इंच, पणजी 11 इंच, फोंडा 16.5 इंच, पेडणे 11 इंच, म्हापसा 9 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे.

दरम्यान गेल्या 24 तासात पडलेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे मि.मीमध्ये. म्हापसा 90 मिमी, पेडणे 64.8, फोंडा 60.4, पणजी 114.5, जुने गोवे 97.2, सांखळी 72.2, वाळपई 39.8, काणकोण 103.6, दाबोळी 111.2, मडगाव 78.1, मुरगाव 163.9, केपे 40, सांगे 59.6 मिमी.

कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रिवादळात रुपांतर

राज्यात पडणारा पाऊस हा पुढील दोन दिवस म्हणजेच दि. 26 ऑक्टोबरपर्यंत मुसळधारपणे पडणार आहे, असा इशारा पणजी वेधशाळेने दिलेला आहे. यंदा ‘दिवाळी पावसाळ्य़ात’ आली अशा पद्धतीची निवेदने सध्या नागरिक करीत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टय़ाचे चक्रिवादळात रुपांतर झालेले आहे. रत्नागिरीपासून ते 390 तर मुंबई पासून 460 कि.मी. दूरवर हे वादळ तयार झालेले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

नरकासूर बुडाले!

या मुसळधार पावसामुळे यावर्षी दिवाळीतील नरकासूर स्पर्धा अनेक संस्थांनी रद्द केल्या आहेत. राज्यात अनेक ठिकाणी नरकासूर प्रतिमा तयार करण्याचे कामही आता उत्साही युवकांनी सोडून दिले. अनेक ठिकाणी नरकासूर प्रतिमा भिजून गेलेल्या आहेत. त्यामुळे नरकासूर प्रतिमा दिवाळीत बांधून पूर्ण होतील की नाही याची शाश्वती देता येत नाही. 

गोव्यावरील धोका टळला

अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा गेल्या सहा तासांमध्ये पूर्व-उत्तर दिशेने ताशी 7 किलोमीटर गतीने सरकला आहे. त्यामुळे गोव्यावरील धोका टळलेला आहे. काल गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात स्थिरावला असून तो रत्नागिरीपासून 310 कि.मी, मुंबईपासून 450 कि.मी, सलाल्ह ओमानपासून 1790 किलोमीटर अंतरावर तो आहे. आगामी  12 तासात तो पुढे सरकून चक्रीवादळात रुपांतर होऊ शकते. 25 ऑक्टोबर सायंकाळपर्यंत ते पुढे सरकत जाईल आणि नंतर पुन्हा वळण घेऊन दक्षिण ओमानपासून समुद्रीतटीय प्रदेशांमध्ये जाण्याची शक्यता आहे.

Related posts: