|Monday, December 9, 2019
You are here: Home » leadingnews » मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार आग्रही, मातोश्रीवर उद्या बैठक

मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आमदार आग्रही, मातोश्रीवर उद्या बैठक 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

विधानसभा निवडणुकीचे सर्व निकाल कालच लागले आहेत. त्यानंतर आता राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची तातडीची आणि महत्त्वाची बैठक उद्या, शनिवारी दुपारी 12 वाजता मातोश्री निवासस्थानी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत तसेच पुढील रणनितीबाबत त्यांचा कल जाणून घेणार आहेत. त्यानंतरच सेनेची पुढची दिशा ठरणार आहे. दरम्यान, शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी सर्व सेनेचे सर्व आमदार आग्रही आहेत.

महाराष्ट्राने पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीला सत्तेसाठी कौल दिला असला तरी यावेळी दोन्ही पक्षांचं संख्याबळ पाहिल्यास शिवसेनेचे पारडे जड राहणार आहे. भाजपला 105 तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या असून बहुमताचा 145 हा आकडा लक्षात घेता शिवसेनेच्या तालावरच भाजपला चालावं लागणार आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपला लोकसभा निवडणुकीवेळी ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून दिली. आपल्यात जे ठरलंय त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आता आली आहे. जागावाटपात समजून घेतलं पण आता मात्र सत्तावाटपात मी समजून घेणार नाही, सूर उद्धव यांनी लावला होता. त्यानंतर शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदारही आता या मागणीवर जोर देऊ लागले आहेत.

सत्तेत शिवसेनेला समान वाटा मिळावा, पहिली अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळावं, महत्त्वाची खाती दोन्ही पक्षांमध्ये विभागली जावीत, यासाठी आपण ठाम भूमिका घ्यायला हवी, असा आग्रह या बैठकीत शिवसेनेचे आमदार उद्धव यांच्याकडे धरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Related posts: