|Sunday, January 19, 2020
You are here: Home » Top News » महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे असंविधानिक : सर्वोच्च न्यायालय

महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे असंविधानिक : सर्वोच्च न्यायालय 

पुणे / वार्ताहर : 

देशभरातील मशिदीमध्ये महिलांना नमाज पडण्याकरिता वेगळी व्यवस्था असावी तसेच मशिदीत जाऊन नमाज पडण्याची त्यांना कायदेशीर परवानगी मिळावी, याकरिता पुण्यातील जुबरे पीरजादे यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असता महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे असंविधानक आणि बेकायदेशीर असल्याची टिप्पणी न्यायालयाने केली आहे. याप्रकरणी केंद्राने लवकरच यासंदर्भातील स्वतःचे म्हणणे न्यायालयात सादर करावे, असे सांगत याबाबत पुढील सुनावणी पाच नोव्हेंबरला होईल, असे सांगितले आहे.

 सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश रंजन गोगई, न्यायाधीश एस. ए. बोबडे व न्यायाधीश एस. अब्दुल नझीर यांनी केंद्र सरकारला एक आठवडय़ाची मुदत दिली आहे. त्यासोबत राष्ट्रीय महिला आयोग, सेंट्रल वक्फ कौन्सिल, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनाही यासंदर्भात कळविण्यात आले असून त्यांनी त्यांचेही म्हणणे सादर करावे, असे सांगण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचप्रकारे मागील वषी 28 सप्टेंबरला केरळमधील शबरीमाला मंदिरातील 10 ते 50 वयोगटातील महिला बंदी उठवण्याचा आदेश दिला होता.

याबाबत जुबेर पीरजादे म्हणाले, महंमद पैगंबर यांच्या काळापासून महिला दररोज पाच वेळा मशिदीत जाऊन नमाज पडत असल्याची पद्धत आहे. रमजान ईद सणाच्या दिवशीही त्या मशीदीत नमाज पडतात. जगभरातील मशिदीत महिला मशिदीत जाऊन नमाज पडू शकतात आणि त्याकरिता त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येते. परंतु, भारतात मौलवी, उलेमा, मशीद ट्रस्टी यांनी चुकीची कारणे देत मुस्लीम धर्मात महिला मशिदीत नमाज पडू शकत नाही, असे सांगत गैरसमज पसरवला आहे. संविधानाने आपणास ज्याप्रकारे मूलभूत अधिकार दिले आहे, त्याचप्रमाणे धर्माचा अधिकार महिलांना मिळाला पाहिजे. जानेवारी महिन्यात यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि एप्रिलमध्ये ती न्यायालयाने स्वीकारली असून सर्वोच्च न्यायालयाची भूमिका याप्रकरणी स्वागतार्ह आहे. केंद्र सरकारने ठोस भूमिका घेत स्वतःचे म्हणणे न्यायालयात लवकर सादर करावे.

Related posts: