|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » एमपीटीच्या अध्यक्षांविरूध्द एफआयआर नोंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

एमपीटीच्या अध्यक्षांविरूध्द एफआयआर नोंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश mpt

प्रतिनिधी/ .वास्को

मुरगाव बंदर क्षेत्रात नांगरून ठेवण्यात आलेले ते नाफ्तावाहू जहाज अखेर दोना पावला किनाऱयानजीक पोहाचले आहे. हे जहाज तेथील किनाऱयावर रूतलेले असून या जहाजाची समस्या आता अधिकच गंभीर बनली आहे. जल प्रदुषणाचा गंभीर धोका निर्माण झालेला आहे. सरकारने या प्रकरणी एमपीटीला पूर्णपणे जबाबदार धरलेले असून या प्रकरणाची चौकशी करून एमपीटीच्या अध्यक्षांविरूध्द एफआयआर नोंद करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाऱयांना दिला आहे. हे प्रकरण एमपीटीला शेकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

मागच्या जुलै महिन्यांपासून नु शी नलीनी हे नाफ्तावाहू जहाज मुरगाव बंदरात होते. या जहाजाची पाश्वभूमी वादग्रस्त आहे. त्यामुळे काही बंदरांनी या जहाजाला आश्रय देणे नाकारले होते. मात्र, एमपीटीने त्यांची मदत केली. ही मदतच आता एमपीटीला भोवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मुरगाव बंदरात ज्या कंपनीने या जहाजातील नाफ्ता स्विकारण्याची तयारी दर्शवली होती, त्या कंपनीलाही काही तांत्रीक कारणामुळे जहाजामधिल नाफ्ता पुरविणे शक्य झाले नाही. त्यामुळेच हे जहाज तीन महिने मुरगाव बंदराच्या धक्क्यावरच अडकले होते. एमपीटीने ते हल्लीच धक्क्याबाहेर परंतु मुरगाव बंदर क्षेत्राच्या सिमेवरच समुद्रात नांगरले होते. एमपीटीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे जहाज खाली करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पुढील चार दिवसांत हे काम उरकण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच हे जहाज वादळी वाऱयात अडकले. गुरूवारी संध्याकाळपर्य हे जहाज बंदर क्षेत्रातच घुटमळत होते. मात्र रात्रीनंतर निर्माण झालेल्या वादळी वाऱयात सदर जहाज नांगरासह दोनापावलाच्या दिशेने पुढे सरकत राहिले. सध्या हे जहाज दोनापावला येथील किनाऱयाजवळ पोहोचलेले असून ते किनाऱयानजीकच्या तळाशी रूतलेले आहे. काबो राजनिवासापासून हे जहाज रूतल्याचे ठिकाण अगदी जवळ आहे.

सदर जहाज वाळूत रूतल्याने या जहाजाची समस्या अधिकच गंभीर बनलेली आहे. सध्या या जहाजातील इंधन बाहेर काढण्याची प्रक्रीयाही धोक्याची ठरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भरतीच्या वेळी हे जहाज पुन्हा हेलकावे खावू शकते. अशा तेथील खडकाने हे जहाज आदळल्यास नाफ्ता गळतीची दाट शक्यता आहे. नु शी नलीनी हे जहाज आता रिवर प्रिन्सेंस सारखे संकट बनून राहण्याचा धोका व्यक्त करण्यात येत आहे. जहाजातून इंधन गळती झाल्यास गोव्यातील समुद्रात भिषण प्रदुषण उद्भभवू शकते. मात्र, हा धोका टाळण्यासाठी तटरक्षक दलाच्या मदतीने एमपीटी या जहाजावर लक्ष ठेवून आहे. मात्र कालपर्यंत या दिशेने ठोस कृती दिसून आली नव्हती.

नु शी नलीनी या जहाजामुळे गोव्यातील समुद्रावर नवीन संकट घोंगावू लागल्याने   सध्या प्रशासकीय पातळीवर चिंता पसरलेली आहे. सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे. या साऱया प्रकरणी एमपीटी लक्ष्य ठरलेली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेदर जहाज पाकिस्तानातून बाहेर पडले होंते. त्यानंतर कोची बंदरानजीक या जहाजाला अपघात झाला. सदर जहाज अडचणीतही सापडलेले आहे. एका वित्तीय संस्थेनेही भरपाईसाठी या जहाजामागे तगादा लावलेला आहे. या जहाजाची पाश्वभूमी वादग्रस्त असल्याने काही बंदरानी या जहाजाला आश्रय देण्यास नकार दिला होता. अखेर मुरगाव बंदराकडे हे जहाज वळले. आर्थिक अडचणीत असलेल्या एमपीटीने या जहाजापासून बंदरालाच लाभ होणार या अपेक्षेने मुरगाव बंदरात जहाजाला प्रवेश दिला. मात्र, पुढे अपेक्षीत प्रक्रिया पूर्ण झालीच नाही. जकात खात्यानेही या जहाजापुढे अडचण निर्माण केली. त्यामुळे या जहाजामधील सुमारे तीन हजार मॅट्रीक टन नाफ्ता खाली होऊ शकला नाही. तीन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर एमपीटीने हे जहाज बंदराच्या सिमेवर आणून नांगरले व आता या जहाजाला नैसर्गीक संकटाने घेरले. या जहाजाची एकूण स्थिती लक्षात घेऊन सदर जहाजावरील सर्व अधिकारी व खलाशांनी जहाजाला राम राम ठोकल्याने हे जहाज काही दिवस भर समुद्रात कुणाच्याही नियंत्रणावीना होते. मात्र, वादळी वातावरणात हे जहाज संकटात सापडल्याने एमपीटी व्यवस्थापनही खडबडून जागे झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संकटासंबंधी काल शुक्रवारी राज्याचे मुख्य सचिव व अन्य वरीष्ठ प्रशासकीय अधिकाऱयांसमवेत बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी व अधिकाऱयांनी या गंभीर समस्ये प्रकरणी एमपीटी व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. नु शी नलीनी या जहाजाची पाश्वभूमी वादग्रस्त असताना व अन्य बंदरानी तीला प्रवेश देण्यास नकार दिलेला असताना एमपीटीच्या अध्यक्षांनी तीला अपेक्षा आणि सुरक्षेच्या हमीवर प्रवेश दिला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी करून एमपीटीच्या अध्यक्षांविरूध्द आफआयआर नोंद करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱयांना दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण एमपीटीला शेकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

तूर्तास घाबरण्याचे कारण नाही : मुख्यमंत्री 

वादळी वाऱयामुळे भरकटून दोनापावला भागात अडकून पडलेल्या नाफ्तावाहू जहाजामुळे एमपीटी विरोधात तक्रार दाखल करण्याचे संकेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. काल या जहाजाच्या कॅप्टनला मुख्यमंत्र्यांनी बोलावून घेतले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी याबाबत चर्चा केली.

या टँकर जहाजामध्ये 3 हजार मेट्रिक टन नाफ्ता आहे. नाफ्ता गळती झाल्यास काय करावे व कोणती उपाययोजना करावी यासंदर्भात तज्ञांचा सल्ला घेतला आहे. त्याचबरोबर अशा खासगी पार्टनर कंपनीलाही सोबत घेतले आहे. या बोटीतील नाफ्ता काढण्यासाठी दुसरे एक जहाज येत्या दोन दिवसांत गोव्यात येणार आहे. नाफ्ता या जहाजात घालून नेला जाणार आहे. या जहाजावर देखरेख ठेवण्यासाठी महसूल सचिवांना सूचना केलेली आहे. महसूल कार्यालयात एक टीम स्थापन केली आहे. ही टीम याबाबत काळजी घेत आहे. त्याचबरोबर शिपिंग इंटस्ट्रीसोबत पत्रव्यवहारही केला जात आहे. आवश्यक ती काळजी सरकारने घेतली आहे. त्यामुळे तूर्तास घाबरण्याचे कारण नाही, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. या जहाजाची पाहणी केली आहे. हे जहाज दगडात अडकून पडले आहे. त्यामुळे ते सहजपणे आणखी भरकटणार नाही. नांगर तुटलेला आहे. मात्र जहाज तेथून हलणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Related posts: