|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पर्यावरणीय दाखला मागे घ्यावा

पर्यावरणीय दाखला मागे घ्यावा 

मुख्यमंत्र्यांची पर्यावरणमंत्रालयाकडे पत्राद्वारे मागणी

प्रतिनिधी/ पणजी

कळसा-भांडुरा प्रकल्पाला केंद्र सरकारने दिलेला पर्यावरणीय परवाना मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. मात्र आमदारांनी राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. आपण म्हादईसंदर्भात पूर्णपणे गंभीर असून गोव्याचे हित जपले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार सुदिन ढवळीकरांचे मंत्रिपद गेल्याने ते इतरांना राजीनामे देण्याचे सल्ले देतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून कर्नाटकाला दिलेली मान्यता त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कळसा, भंडुरा प्रकल्पाद्वारे पाणी वळविण्यासाठी दिलेली मान्यता मागे घ्यावी. त्याचबरोबर पर्यावरण मंत्रालयाने अधिकारी पाठवून या भागाची पाहणी करावी. म्हादई नदी मलप्रभेत वळविण्याच्या कर्नाटकच्या कृतीची दखल घ्यावी. त्याचबरोबर यापुढे म्हादई संदर्भातील कोणत्याही प्रकल्पाच्या कर्नाटकच्या मागणीला प्रतिसाद देऊ नये, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याने तुर्त कोणताही निर्णय घेतला जाऊ नये. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली मलप्रभेत पाणी वळवून ते जलसिंचनासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कर्नाटकच्या कोणत्याही मागणीला केंद्र सरकारने प्रतिसाद देऊ नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

Related posts: