|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महायुतीमधील बंडखोरी भाजपला भोवली

महायुतीमधील बंडखोरी भाजपला भोवली 

कोल्हापूर/प्रतिनिधी

गेल्या काही निवडणुकांचा आलेख पाहता विधानसभा निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या, याला भाजप आणि शिवसेनेतील बंडखोरी कारणीभूत आहे. मात्र या बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली असून यापुढेही करणार आहे. पक्षविरोधी काम करणाऱया वीस ते बावीस लोकांची राज्यस्तरावरून हकालपट्टी करणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना काँग्रेसवाले फसवे असल्याचे माहिती असल्यामुळे पुन्हा राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, गेल्या निवडणुकीत आम्ही 260 जागांवर लढलो होतो. त्यापैकी 122 जागांवर विजय मिळवला. त्याची टक्केवारी होती 44 आणि यावेळी महायुतीतून मित्रपक्षांसह 164 जांगा भाजप वाटय़ाला आल्या. त्यामध्ये 105 जागांवर विजय मिळवला त्याची टक्केवारी 67 इतकी आहे. त्यामुळे भाजपला कमी जागा मिळालेल्या नाहीत. मात्र शेवटी आकडे हे आकडे असतात. मताच्या टक्केवारीचा विचार करता भाजपाला 26 टक्के तर शिवसेनेला 16, कॉंग्रेसला 16 आणि राष्ट्रवादीला 17 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे मतांमध्येही भाजप आघाडीवरच आहे. आता पुन्हा राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार आहे. उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपूत्र आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेसला मदत केली नाही. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना काँग्रेसवाले फसवे आहेत याची जाणीव असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूरमध्ये झालेल्या पानिपतबद्दल बोलताना पाटील म्हणाले, खासदार संजय मंडलिक यांनी पैरा फेडण्याची उघड भाषा केली. त्यातून त्यांनी चार उमेदवार पाडायला मदत केली. प्रचंड विकास कामे करूनही लोकांनी दिलेला निकाल धक्कादायक आहे. तो मान्य असला तरी आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे. दोन खासदारांवरून दिल्ली काबीज करणारा हा पक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात शुन्यावरूनही आम्ही पुढे जाऊ असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

आता त्यांचा इव्हीएमवरती विश्वास बसेल

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, निवडणुकीपुर्वी ईव्हीएमबाबत अनेक आंदोलने झाली. शंका व्यक्त करण्यात आल्या आता ईव्हीएम बाबत विरोधकांचे काय मत आहे ? मला तर तुम्हीच ईव्हीएम बदलले का अशी शंका यायला लागली आहे. निश्चितच आता मशिनवर त्यांचा विश्वास बसेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सत्तेचा सन्मानजनक तोडगा काढला जाईल

शिवसेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची मागणी आहे, त्यावर काय तोडगा काढला आहे असे विचारता, चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बोलतील मी बोलणार नाही. मात्र निघणारा तोडगा हा शिवसेना, भाजप या दोघांचेही समाधान करणारा, सन्मान वाढविणारा असाच असेल. तसेच सत्तास्थापनेच्या चर्चेमध्ये मी देखील दृष्य आणि अदृष्य स्वरूपात सहभागी असतो. त्याची दोन दिवसांत आपल्याला प्रचिती येईल असे पाटील यांनी पत्रकारांना सांगितलें.

उदयनराजेंचीही पक्ष काळजी घेईल

सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे यांचा पराभव झाला. याबाबत विचारता चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. त्या पराभवाची अजूनही चिकीत्सा व्हायची आहे. उदयनराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यामुळे पक्ष त्यांचा योग्य तो सन्मान करेल, काळजी घेईल . त्याबाबत वरीष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाईल असे पाटील यांनी सांगितले.

Related posts: