|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » मनोरंजन » …अशी मिळाली खारी

…अशी मिळाली खारी 

‘खारी बिस्कीट’ म्हणजे नेमके काय? हा प्रश्न अनेकांना पडला होता. खरेतर ही आहे चिमुरडय़ा भावंडांची जोडगोळी. या मधली खारी म्हणजे अवघ्या पाच वर्षांची गोंडस पण अंध मुलगी. ती हे जग तिच्या डोळय़ांनी पाहू शकत नसली तरी ती स्वप्ने बेमालूमपणे पाहते. लहानग्या, निरागस अंध खारीचे कास्टिंग हा या चित्रपटाचा एक फार महत्त्वाचा भाग होता आणि आव्हानही होते.

खारी हे पॅरेक्टर अंध असल्यामुळे तिला आर्टिफिशिअल लेन्स लावण्यात येणार होत्या. खारीचे वय 5 वर्षे असल्यामुळे शूटिंगदरम्यान पाठांतर सुद्धा महत्त्वाचे होते. सर्व प्रकारचे अग्निदिव्य पार करून सुमारे 350 मुलींच्या ऑडिशन्सनंतर खारी म्हणजेच वेदश्री मिळाली आणि तीन महिन्याच्या ब्लाईंडनेस ट्रेनिंग वर्कशॉपनंतर वेदश्री खारी साकारायला सज्ज झाली. हे आव्हान फक्त तिने स्वीकारलेच नाही तर पेलवून दाखवले. यानिमित्ताने दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ‘खारी बिस्कीट’ ही फिल्म माझ्यासाठी फार स्पेशल आहे आणि त्यात खारीचे कास्टिंग अत्यंत महत्त्वाचे होते. पण तिने ज्या पद्धतीने खारी समजून उमजून साकारलीय त्याला तोड नाही. वेदश्रीशिवाय दुसरी खारी होणे शक्य नाही. तिच्या टीजरला आणि गाण्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद हीच तिच्या मेहनतीची पावती आहे.

संजय जाधव यांच्या मैत्रीचे किस्से आपल्याला काही नवीन नाहीत. पण ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक संजय जाधव यांना बच्चेकंपनी सोबत मैत्री करायला वेगळाच प्रयत्न करावा लागला. त्यांच्या 50 फिल्म्सच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच ते लहान मुलांसोबत काम करत आहेत. लहान मुलांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांच्या वयाचे होऊन काम करण्याची कसरत दिग्दर्शकासह संपूर्ण टीमला करावी लागते. आजपर्यंत डीओपी, लेखक, दिग्दर्शक तर कधी अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणाऱया संजय जाधव यांचा ‘खारी बिस्कीट’चा अनुभव ते फार खास असल्याचे सांगतात. लहान मुले निरागस असतात आणि मस्तीखोर सुद्धा! त्यांनी माझ्यासोबत आणि मी त्यांच्यासोबत काम करण्याचा तसा पहिलाच अनुभव. त्यांच्या बरोबरीने आणि त्यांच्या कलाकालाने काम करणे खरेच चॅलेंजिंग होते. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या खारी, बिस्कीट, मांजा, मॅजिक आणि पिलेट या सर्वांशी छान गट्टी जमली आणि माझे काम सोपे झाले. आपल्याला वाटते की मुले आपल्याकडून शिकत असतात, मात्र इथे या मुलांकडून मला बरेच शिकायला मिळाले. त्यामुळेच मला त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचे होते.

चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी केक कटींग करून रॅपअप पार्टी करण्याचे ठरले. त्याप्रमाणे सर्वकाही घडले सुद्धा. त्यानंतर मात्र या बच्चेकंपनीला आश्चर्याचा धक्का बसला. कारण आमच्या प्रॉडक्शन टीमने पाचही मुलांना सरप्राईज गिफ्ट देण्यासाठी सायकल्स् आणल्या होत्या. माझ्या लहान मित्रांना दिलेल्या या आगळय़ा वेगळय़ा सरप्राईजमुळे जे समाधान मला जाणवले तसे यापूर्वी कधीच मिळाले नव्हते. माझ्या छोटय़ाशा गिफ्टमुळे जो आनंद मी त्यांच्या निरागस चेहऱयावर पाहिलाय तो शब्दात सांगता येणे शक्य नाही, असे संजय जाधव यांनी सांगितले. येत्या 1 नोव्हेंबरला  ‘खारी बिस्कीट’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Related posts: