|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » प्रदूषणामुळे सराव सत्रात बदल होण्याची शक्यता

प्रदूषणामुळे सराव सत्रात बदल होण्याची शक्यता 

रविवारी 3 रोजी होणार भारत-बांगलादेश पहिला सामना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीच्या प्रदूषित हवामानात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने भारतीय संघ अरुण जेटली स्टेडियमवर सराव न करता जिममध्ये अधिक वेळ घालविण्याची शक्यता बोलली जात आहे. येत्या रविवारी बांगलादेशविरुद्ध येथे पहिला टी-20 सामना होणार आहे. यासाठी टीम इंडिया 31 रोजी येथे दाखल होणार असून त्यांच्यासाठी दोन सराव सत्रे ठेवण्यात आली आहेत.

दोन्ही सराव सत्रे 1 व 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत ठेवण्यात आली आहेत. पण ती ऐच्छिक ठेवली जाण्याची शक्यता वाटते. या घडोमोडीची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, शुक्रवारी व शनिवारी हवामानाचा अंदाज घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ‘सामन्यावेळी कोणतीही मुख्य अडचण येणार नाही. कारण खेळ दिवस-रात्र होणार आहे. सकाळच्या सत्रात होणाऱया सरावावेळी अडचण येऊ शकते. हवामानाचा दर्जा न सुधारल्यास सराव ऐच्छिक ठेवले जाऊ शकते. ही नव्या मोसमाची सुरुवात नाही आणि खेळाडूंनीही बरेच सामने खेळलेले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या ब्रेकनंतर जिममध्ये जाण्याला ते प्राधान्य देऊ शकतात. संघातील वरिष्ठ खेळाडू शनिवारी दाखल झाले तरी ते फक्त स्थितीचा आढावा घेतील. पण या सर्व गोष्टी हवामानावर अवलंबून राहतील,’ असे या सूत्राने सांगितले.

हवामानामुळे शनिवारच्या सराव सत्राच्या वेळेत किंचित बदल होऊ शकतो. कारण सकाळचे हवामान सरावासाठी अडचणीचे ठरणारे असते. बांगलादेश संघही गुरुवारी सराव करणार आहे. पण तेही होण्याची शक्यता कमी वाटते. शनिवारची वेळही ते बदलून मागण्याची शक्यता आहे.

दिवाळीमुळे दिल्लीच्या हवेतील प्रदूषण आणखी वाढले असून या सामन्याचे केंद्र बदलण्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र बीसीसीआय कार्यकारिणीने सामन्याच्या ठिकाणात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. याशिवाय डीडीसीएने या सामन्याच्या तिकीटविक्रीलाही सोमवारपासून प्रारंभ केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: