|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » अवकाळीच्या दणक्याने निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान

अवकाळीच्या दणक्याने निर्यातक्षम द्राक्षांचे नुकसान 

80 ते 90 कोटींचे नुकसान असण्याची शक्यता : परकीय चलन देणारे शेतीपीक धोक्यात

प्रतिनिधी/ विटा

दुष्काळी खानापूर तालुक्यात यावर्षी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. दिवाळी संपली तरी पाऊस कायम असल्याने निर्यातक्षम द्राक्षबागेसह रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खानापूर तालुक्यातील शेती नुकसानीचा आकडा 80 ते 90 कोटी रूपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने शेतकऱयांना भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

खानापूर तालुका कायम दुष्काळीपट्टय़ात येतो. या भागात साधारणपणे परतीच्या पावसाचे प्रमाण अधिक असते. परंतु गेल्या काही वर्षात पावसाचे वेळापत्रक बिघडल्याने कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी अवकाळी अशा नैसर्गिक संकटांचा सामना करीत शेतकरी शेतातून उत्पादन घेत आहेत. खानापूर तालुक्यातील पळशी, हिवरे, करंजे, बेणापूर, बलवडी (खा.), भूड, लेंगरे, देविखिंडी अशा डोंगर पायथ्याच्या गावातून निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. तर टेंभू योजनेचे पाणी आल्यानंतर माहुली, वेजेगाव, साळशिंगे, नागेवाडी, भाळवणी, आळसंद परिसरात ऊसाचे क्षेत्र माठय़ा प्रमाणात वाढले आहे. याशिवाय भूईमुग, उडीद, शाळू, गहू, हरभरा अशा पिकांची लागण मोठय़ा प्रमाणात होते.

गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱया पावसाने दाक्ष शेती अडचणीत आली आहे. हंगामपूर्व छाटणी घेतलेल्या बागांना सततच्या पावसाने दावणी आणि करपा रोगाने जडले आहे. निर्यातक्षम द्राक्षबागातून फळकुज होवू लागल्याने नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. वास्तविक पाहता निर्यातक्षम द्राक्षांवर मुळातच अत्यंत महागडी औषधे फवारलेली असतात. शिवाय त्या औषधांचा अंश द्राक्षात राहणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे औषध फवारणी करताना बागायतदारांना खुपच मर्यादा येतात. अशा परिस्थितीत बागांच्या बागा दावणी आणि करप्याच्या रोगांना बळी पडू लागल्या आहेत. यामुळे निर्यातक्षम द्राक्ष शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सततच्या पावसाने पाणी साठून राहल्याने ऊसाची पिके झोपू लागली आहेत. मुळकूज होत असल्याने ऊस जमीनदोस्त होत आहे. भुईमुगाला कोंब फुटू लागले आहेत. त्यामुळे भूईमुग, उडीद, ऊस, शाळू, गहू अशा पिकांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी तालुक्यातील शेतकरी हडबडला आहे.

खानापूर तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनामुळे परकीय चलन मिळत असते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तालुक्यातील द्राक्षांना चांगली मागणी आहे. त्यामुळे तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन होते. अशा परिस्थितीत अवकाळीच्या नैसर्गिक संकटामुळे एकटय़ा खानापूर तालुक्यातील शेतीचे 80 ते 90 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

पंचनामे करून नुकसानीचा अहवाल द्या – आमदार अनिल बाबर

दरम्यान शेती नुकसानीचे पंचनामे करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करावा, अशी मागणी आमदार अनिल बाबर यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे केली आहे.

Related posts: