मिरजेत घरगुती भांडणातून पत्नीची हत्या

प्रतिनिधी/ मिरज
शहरातील नदीवेस भागात राहणाऱया सौ. सुमन मलगोंडा पाटील (वय 49) यांची पती मलगोंड रामगोंडा पाटील (वय 61) याने घरगुती भांडणातून खुरप्याने वार करुन हत्या केली. हत्त्येनंतर मलगोंड पाटील हा स्वतःहून शहर पोलिसात हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
मलगोंड पाटील हा शेतमजूर आहे. तो नदीवेसमधील भोसले वाडय़ात पत्नी आणि मुलासह राहण्यास आहे. त्याची पहिली पत्नी मयत असून, 20 वर्षांपूर्वी त्याचा सुमन यांच्याशी दुसरा विवाह झाला आहे. त्यांच्यापासून त्यांना एक अपत्त्यही झाले आहे. गेली काही दिवस त्यांच्यात घरगुती कारणातून भांडणे होत. मात्र, नातेवाईक आणि शेजारपाजारांच्या मध्यस्तीने ही भांडणे मिटत असत. बुधवारी मलगोंड पाटील हा घरीच होता. त्याचा मुलगा हा बाहेर गेला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास मलगोंडा आणि पत्नी सुमन यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यात रागाच्या भरात मलगोंडा याने घरातच असलेल्या खुरप्याने सुमन याच्या डोक्यात आणि गळ्यावर वार केले. खुरप्याचे वार खोलवर लागल्याने आणि मोठा रक्तस्त्राव झाल्याने सुमन यांचा जागीच मृत्यू झाला. सुमन मयत झाल्याची खात्री होताच मलगोंडा पाटील याने घरास कुलूप घातले आणि तो शहर पोलिसात हजर झाला. त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. घराला कुलूप घातल्याने शेजाऱयांना या खूनाची माहिती समजली नाही.
पोलिस उपाधीक्षक संदीपसिंग गील आणि निरीक्षक राजू ताशिलदार हे पोलिस कर्मचाऱयांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटनास्थळावरच ज्या खुरप्याने मलगोंडा याने पत्नीवर वार केले होते, ते रक्ताने माखलेले खूरपे मृतदेहा शेजारी पडले होते. पोलिसांनी ते जप्त केले आहे. सुमन ही मलगोंडाची दुसरी पत्नी असून, 20 वर्षांपूर्वी त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षांपासून नदीवेसमधील भोसले वाडय़ात भाडय़ाने राहण्यास होता. तो कुरणे यांच्या शेतात काम करीत असे. सध्या दिवाळीचे दिवस असल्याने तो घरीच होता. या घटनेने नदीवेससह मिरजेत खळबळ माजली आहे. रात्री उशिरापर्यंत फिर्याद घेण्याचे काम सुरू होते.