|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » अतिरिक्त लोटे’त उद्योगांना भूखंड वाटपास स्थगिती

अतिरिक्त लोटे’त उद्योगांना भूखंड वाटपास स्थगिती 

प्रतिनिधी /चिपळूण :

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या लगत नव्याने उभारण्यात येणाऱया अतिरिक्त लोटे वसाहतीमध्ये रासायनिक कारखान्यांना स्थानिकांकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे आता या वसाहतीत रासायनिक उद्योगांना भूखंड वाटपास स्थगिती देण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. या बाबतचे पत्र एमआयडीसीकडून दक्षता समितीचे कार्याध्यक्ष हुसेन ठाकूर यांना प्राप्त झाले आहे.

  या अतिरिक्त लोटे औद्योगिक वसाहतीत सात्विणगाव, असगणी परिसरातील सुमारे 700 हेक्टर जागा एमआयडीसीने संपादित केल्या आहेत. या वसाहतीतील जागांचा मोबदला अजूनही स्थानिकांना मिळालेला नाही. यापूर्वीच लोटे वसाहतीतील पर्यावरण प्रदुषणाच्या समस्येने धोक्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त लोटेत प्रदूषणकारी कारखाने नकोत, अशी भूमिका असगणी येथील दक्षता समितीने घेतली होती. एमआयडीसीने संपादित जागेवर मूलभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. याच वसाहतीमध्ये 500 कोटी रूपये गुंतवणुकीचा कोका-कोला प्रकल्प, रेल्वेचे पार्ट बनवणारा कारखाना प्रस्तावित आहे. जागा संपादित केल्यानंतर एमआयडीसीने 5 भूखंड रासायनिक कारखान्यांना, तर 11 भूखंड इतर कारखान्यांना दिले आहेत.

  स्थानिकांचा विरोध असतानाही रासायनिक कारखान्यांना भूखंड दिला गेल्याने दक्षता समितीने एमआयडीसीचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच एमआयडीसीकडून सुरू असलेल्या सर्व मूलभूत सोयीसुविधांचे कामही थांबवण्यात आले. लोकप्रतिनिधींनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केला. जागतिक मंदीमुळे उद्योग अगोदरच डबघाईला आले असतानाच अतिरिक्त लोटेत झालेल्या विरोधामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन एमआयडीसीने या विरोधाची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात आता एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी या औद्योगिक क्षेत्रात रासायनिक उद्योगांना भूखंड वाटप करण्यास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतचे पत्र रत्नागिरी येथील एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱयांनी दक्षता समितीचे कार्याध्यक्ष ठाकूर यांना पाठवले आहे.

Related posts: