भाऊबिजेसाठी देण्यास काही नसल्याने भावाची आत्महत्या

वार्ताहर /मौजेदापोली :
बहिणींना भाऊबीज देण्यासाठी आपल्याकडे काही नसल्याने निराश झालेल्या तीन बहिणींच्या एकुलत्या एक भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच दापोली तालुक्यातील लाडघर येथे घडली.
चंद्रकांत झगडे (26) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून तो राष्ट्रीय धावपटू होता. भाऊबिजेची भेट म्हणून तिन्ही बहिणींनी मिळून चंद्रकांतला बुलेट दिली होती. मात्र बहिणींना देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही, या नैराश्येतून चंद्रकांतने घराशेजारील आंब्याच्या बागेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली.
दापोली तालुक्यातील लाडघर येथे चंद्रकांत याने जीवन संपवले. तीन बहिणींनी आपल्याला भाऊबिजेला बुलेट दिली. मात्र बहिणींना देण्यासाठी आपल्याकडे काहीच नाही, आपण बहिणीला काही देऊ शकलो नसल्याची खंत चंद्रकांतच्या मनात होती. त्यामुळे बुधवारी सकाळपासूनच तो कोणाशीही फारसा बोलत नव्हता. वडील दुसऱया गावात कार्याला निघाले असताना मृतावर वहाण्यासाठी घेतलेली फुले घरातच राहिली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ते पुन्हा घरी आले. फुले घेतली व पुन्हा जात असताना अर्ध्या रस्त्यातच त्यांना चंद्रकांतने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच ते तातडीने घरी परतले. आत्महत्या करण्यापूर्वी चंद्रकांत याने माझ्या मृत्यूस कोणाला जबाबदार धरू नये, असे लिहून ठेवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची दापोली पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कमलाकर चौरे करीत आहेत.