|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेडगेवाडीत दुकान फोडून सव्वालाखाची रोकड लंपास

शेडगेवाडीत दुकान फोडून सव्वालाखाची रोकड लंपास 

वार्ताहर /शेडगेवाडी :

शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील राजलक्ष्मी ट्रेडर्स दुकान चोरटय़ांनी फोडून रोख रक्कम 1 लाख 21 हजार रुपयांची चोरी केली आहे. आठवडय़ात ही तिसरी चोरी झाली असल्याने पोलिसांच्या समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेमुळे येथील व्यापारी लोक भयभीत झाले आहेत. कोकरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या 2 महिन्यापासून चोरीचे सत्र सुरूच असून पोलिसांचा उपयोग काय असा सवाल उपस्थित होत आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, शेडगेवाडी येथे पप्पू सुजाराम चौधरी यांचे राजलक्ष्मी ट्रेडर्स हे होलसेल मालाचे दुकान असून चोरटय़ांनी शटरची पट्टी कापून  आत असलेले सीसीटीव्ही कॅमेऱयाची दिशा बदलून आत प्रवेश केला. या फुटेजमध्ये तीन चोरटे तोंडाला रुमाल बांधून, जर्किन, टोपी परिधान केलेले दिसत आहेत. दोघे बाहेर थांबले व एक जण आत गेला. त्यांनी दुकानातील रोख रक्कम 1 लाख 22 हजार रुपये चोरून नेले. दुकानात गोडाऊनमध्ये झोपलेल्या पप्पू चौधरी यांना कसलाही आवाज आला नसून एवढय़ा शिताफीने चोरटय़ांनी चोरी केल्याने येथील व्यापारी भयभीत झाले आहेत. घटनेची नोंद कोकरूड पोलिसात करण्यात आली असून पोलीस उपविभागीय अधिकारी पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून सांगली येथील श्वान पथकास पाचारण करण्यात आले.

या अगोदर पांडुरंग एटम, आटूगडेवाडी,  मंगल पाटील, येळापूर,  प्रभाकर कांबळे, चांगदेव एटम आटूगडेवाडी व शिवाजी पाटील, येळापूर, दगडू हाप्पे यांचेही दुकान फोडून चोऱया केल्या आहेत, त्याचा अद्याप पर्यंत पोलिसांना छडा लावण्यात यश मिळालेले नाही.

पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी शेडगेवाडी येथील चोरी झालेल्या ठिकाणी भेट दिली. पिंगळे म्हणाले की, पहिल्या चोरी वेळीच पोलिसांनी तपास केला असता तर उर्वरित चोयांना लगाम बसला असता. या चोरीचा तपास करून चोरटय़ांनी जेरबंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts: