|Friday, February 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डेंग्यूचे रूग्ण वाढल्याने रक्ताचा तुटवडा

डेंग्यूचे रूग्ण वाढल्याने रक्ताचा तुटवडा 

प्रतिनिधी /सांगली :

गेल्या अनेक दिवसापासून शहरात डेंग्यूच्या आणि साथीच्या आजारांच्या रूग्णात मोठय़ाप्रमाणात वाढ झाली आहे. या रूग्णांना तातडीने प्लेटलेट चढविण्याची गरज असते. त्यामुळे रक्ताची मोठय़ाप्रमाणत मागणी वाढली आहे. सामाजिक संस्थांच्याकडून भरविण्यात येणारी रक्तदान शिबिरे गेल्या अनेक दिवसांपासून झाले नसल्याने रक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना हव्या त्या गटाचे रक्त मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. 

शहरात मोठय़ाप्रमाणात डेंग्यूच्या डासांचा प्रार्दुभाव वाढला आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ वाढतच चालली आहे. या डेंग्यूच्या रूग्णांच्या रक्तातील प्लेटलेट कमी होतात. या प्लेटलेट वाढविण्यासाठी त्याला रक्त देण्याची गरज असते. हे रक्त तातडीने चढविल्यास त्याची प्रकृती सुधारते. त्यामुळे रक्तपेढीमधून या रक्तांची मागणी वाढतच चालली आहे. शहरातील अनेक दवाखान्यात या डेंग्यूचे रूग्ण वाढतच चालले आहेत. या डेंग्यू बरोबर इतर साथीच्या आजाराच्या रूग्णांच्या संख्येतही वाढ होत चालली आहे. त्यामुळे रक्ताची मागणी वाढत चालली आहे.

 अनेक डॉक्टर ज्या रूग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असतात त्या शस्त्रक्रिया या दिवाळी सुट्टीत करून घेत असताता. त्यामुळे अशा शस्त्रकिया करणाऱया रूग्णांचीही संख्या वाढलेली आहे. त्यांच्याकडूनही रक्ताची मागणी वाढत चालली आहे.  सध्या रक्तपेढीमध्ये रक्तांच्या बदली रक्त घेण्यासाठी गर्दी वाढत चालली आहे. पण, पाहिजे त्या गटाचे रक्त मिळण्यासाठी मात्र चांगलीच खटाटोप करावी लागत आहे.

शिबिरे न झाल्याचा परिणाम

शहरातील अनेक सामाजिक संस्था सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. पण दिवाळीच्या आधीपासून अनेकांनी ही शिबिरे रद्द केली आहेत. तसेच आता ही शिबिरे नोव्हेंबरच्या उत्तरार्धात सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रक्ताची आवक कमी होत चालली आहे. सध्या रक्त बदली करून देण्यात येत आहे. सामाजिक रक्तदात्यांचे प्रमाणही आता कमी झाले आहे. त्यामुळे हा रक्तांचा तुटवडा जाणवत आहे.

Related posts: