|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » रमेश जारकीहोळी यांना प्राप्तिकरचा दणका

रमेश जारकीहोळी यांना प्राप्तिकरचा दणका 

प्रतिनिधी /बेंगळूर :

अपात्र आमदार रमेश जारकीहोळी यांना गुरुवारी प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. बेहिशेबी मालमत्ता संपादन केल्याप्रकरणी रमेश जारकीहोळी यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर अधिकाऱयांनी छापे टाकले असून कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे, असे समजते.

निजद-काँग्रेस युतीचे सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या रमेश जारकीहोळी यांच्या गोकाकसह इतर ठिकाणी असलेल्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या सौभाग्य शुगर्समध्ये 105 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचे चौकशीतून समजते. इतकेच नव्हे तर दोन मुले, पत्नी व इतर नातलगांच्या नावे देखील त्यांनी मालमत्ता जमा केलयाचे समजते. त्यांनी दोन मुलांच्या नावे साडेसात कोटी रुपये गुंतवणूक केल्याची माहिती हाती लागली असून 10 पैकी 8 पतसंस्था अस्तित्वातच नाहीत. त्यामुळे गुंतवणुकीचा केंद्रबिंदू असणारी सौभाग्य शुगर्स कारखाना अडचणीत येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. या कारवाईत कागदपत्रे आणि अनेक महत्त्वाची माहिती अधिकाऱयांच्या हाती लागल्याची चर्चा आहे. याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

 काही दिवसांवर विधानसभेची पोटनिवडणूक येऊन ठेपली आहे. यातच ही कारवाई करण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. अद्याप त्यांच्या अपात्रेच्या याचिकेवर निकाल लागलेला नाही. त्याची सुनावणी पूर्ण झाली असून याचा निकाल येणे बाकी आहे. असे असतानाच या कारवाईमुळे निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

Related posts: