|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » पदवीप्रदानवेळी खादी  वापराचे ‘यूजीसी’चे आवाहनवजा आदेश  

पदवीप्रदानवेळी खादी  वापराचे ‘यूजीसी’चे आवाहनवजा आदेश   

 पुणे / प्रतिनिधी :

देशभरातील विद्यापीठांच्या पदवीदानासारख्या कार्यक्रमांसाठी खादीचेच कपडे वापरण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना पुन्हा तंबी दिली आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विद्यापीठे, राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांना खादीच्या कपडय़ांचा वापर करण्याचे आवाहनवजा आदेश ‘यूजीसी’ने दिले आहेत.

विद्यापीठांमधील पदवी प्रदान सोहळय़ात भारतीय संस्कृती दिसण्यासाठी ब्रिटिश पद्धतीचा गाउन आणि कॅप रद्द करण्याची सूचना या पूर्वीच देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ब्रिटिश पद्धतीच्या पोषाखाचाच वापर होताना दिसत आहे. त्यामुळे यूजीसीकडून भारतीय पोशाखासह खादीच्या कपडय़ांचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे. पदवीप्रदान सोहळा किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये खादीच्या कपडय़ांचा कुलगुरूंसह इतर अधिकारी, पदाधिकारी यांनी वापर करण्याचे आदेश यूजीसीने परिपत्रकाद्वारे दिले आहेत. या पूर्वीही असेच पत्र यूजीसीने विद्यापीठांना पाठवले होते. मात्र, अनेक विद्यापीठांनी या पत्रास केराची टोपली दाखवल्याने यूजीसीने आता खादी वापराची तंबी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीचा वापर आणि चरख्याला पुनरुज्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढय़ात हाताने तयार केलेल्या किंवा चरख्याने कातलेल्या सुताने तयार झालेल्या कापडाचा शस्त्राप्रमाणे वापर केला होता. त्यामुळे खादीला स्वातंत्र्याचा गणवेश म्हणून मान्यता मिळाली होती. खादी किंवा चरख्याद्वारे तयार झालेले कापड हे समृद्ध संस्कृती किंवा वारसाच आहे, असे नाही, तर ते ग्रामीण भागातील उपजीविकेचे माध्यमही आहे. त्यामुळे खादी किंवा हातमागाद्वारे तयार झालेल्या कपडय़ांचा वापर करावा, असे यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी विद्यापीठ आणि शिक्षणसंस्थांना पाठवलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Related posts: