|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » नगरमध्ये बाधित पिकांच्या पंचनाम्याला सुरूवात

नगरमध्ये बाधित पिकांच्या पंचनाम्याला सुरूवात 

  जिल्हाधिकारी व्दिवेदी उतरले फिल्डवर, यंत्रणा लागली कामाला

ऑनलाईन टीम / नगर :

   परतीचा पाऊस व  अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. शासन आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनातील कृषी व महसूल विभागाची यंत्रणा कामाला लागली असून, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी जातीनिशी बाधित क्षेत्रांना भेट देत आहेत. जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी कृषी विभाग आणि सर्व तहसीलदार यांना यासाठी तालुका पातळीवर पथके स्‍थापन पंचनामे करण्याची कार्यवाही विनाविलंब करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

जिल्हयात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मोठया प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्वच पिकांची नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने तातडीने पंचनामे करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अवेळी पाऊस आणि अतिवृष्टीने 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱयांनी यासंदर्भात संबंधित तलाठी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, पंचनामे करण्याच्या कामास गती देतानाच जिल्हाधिकारी द्विवेदी नुकसानग्रस्त क्षेत्रांना भेट देत आहेत. राहाता, राहुरी येथील काही नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पहाणी केली. यावेळी त्यांच्या समवेत कृषी उपसंचालक विलास नलगे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

Related posts: