|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » गुजरात किनारपट्टीला ‘महा’ धडकणार

गुजरात किनारपट्टीला ‘महा’ धडकणार 

उत्तर-पश्चिमेच्या दिशेने प्रवास : गुजरात, सौराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाऊस

पुणे / प्रतिनिधी

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘महा’ चक्रीवादळ सध्या उत्तर-पश्चिमेच्या दिशेने सरकत असून, दोन दिवसांत मार्ग बदलून ते गुजरातच्या किनारपट्टीला धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने शनिवारी वर्तविला. पुढील 48 तासात या वादळाची तीव्रता वाढणार असून, याच्या प्रभावामुळे 6 नोव्हेंबरपासून उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, सौराष्ट्र व गुजरातच्या भागात हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अरबी समुदात निर्माण झालेले ‘महा’ चक्रीवादळ शनिवारी वेरावलपासून 540 व दीवपासून दक्षिण-पश्चिमेला 550 किमीवर आहे. सध्या हे वादळ उत्तर-पश्चिमेच्या दिशेने प्रवास करीत असून, 4 नोव्हेंबरपर्यंत त्याचा प्रवास असाच राहणार आहे. 4 नोव्हेंबरनंतर ते वळसा घालून गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने प्रवास सुरू करेल. पुढील 48 तासात या वादळाची तीव्रता वाढणार असून, जेव्हा ते गुजरातच्या दिशेने वळेल, तेव्हा त्याची तीव्रता कमी झालेली असेल. 4 ते 6 नोव्हेंबरदरम्यान याची तीव्रता जास्त राहणार असल्याने पूर्वमध्य अरबी समुदात मोठय़ा लाटा राहतील. तसेच याच्या प्रभावामुळे गुजरात व महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा तसेच लाटांची तीव्रता जास्त राहणार असल्यामुळे मच्छीमारांना 7 नोव्हेंबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस

‘महा’च्या प्रभावामुळे 6 ते 8 नोव्हेंबरच्या दरम्यान, गुजरात, सौराष्ट्र, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

‘क्यार’ सोमालियाकडे

‘महा’च्या आधी निर्माण झालेल्या ‘क्यार’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असून, त्याचे कमी दाबात रुपांतर झाले आहे. पश्चिम-मध्य अरबी समुद्राकडून आता हे क्षेत्र सोमालियाच्या दिशेने जात असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

बंगालच्या उपसागरात वादळ?

थायलंड तसेच लगच्या भागात सध्या हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. याच्यामुळे उत्तर अंदमानच्या भागात 4 नोव्हेंबरच्या आसपास कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होईल. तसेच याची तीव्रता वाढून पूर्व मध्य-बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाच्या निर्मितीची शक्यता आहे.

Related posts: