|Monday, January 27, 2020
You are here: Home » मनोरंजन » शालेय जीवनातील कॉपीचा नवा अन्वयार्थ

शालेय जीवनातील कॉपीचा नवा अन्वयार्थ 

आजच्या दैनंदिन जीवनात कॉपी शब्द अनाहुतपणे वापरला जातो. मोबाईलच्या आजच्या काळात कॉपी-पेस्ट ही कृती प्रत्येकाकडून अनाहूतपणे होत असते. पण, शालेय जीवनात मात्र कॉपी या शब्दाचा अर्थ खूप गहन असून, नकारात्मक आहे. एखाद्याचं शैक्षणिक जीवनच उद्ध्वस्त करणाऱया या कॉपीचा नवा अर्थ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळेच या चित्रपटाचं शीर्षकही कॉपी असं ठेवण्यात आलं आहे. श्री महालक्ष्मी क्रिएशन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा आशयघन चित्रपट येत्या 8 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

कॉपी या शीर्षकाचा चित्रपट बनवण्याची मूळ संकल्पना असलेल्या गणेश पाटील यांनीच या चित्रपटाची निर्मितीही केली आहे. पलाश वधान यांच्या भारत एक्सीमची प्रस्तुती असलेल्या कॉपीचे मोशन पोस्टर सादर झाल्यापासून चित्रपटसृष्टीपासून सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाविषयी कुतूहल आहे. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, विविध पातळीवर वेगवेगळय़ा जबाबदाऱया सांभाळत खऱया अर्थाने कॉपी चित्रपट घडवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. दिग्दर्शनासोबतच त्यांनी राहुल साळवे यांच्या साथीने या चित्रपटाची कथासुद्धा लिहिली आहे. याशिवाय दयासागर आणि हेमंत यांनीच या चित्रपटाची पटकथाही लिहिली आहे.

या चित्रपटाचा विषय सर्वव्यापी आहे. सर्वांच्याच जीवनात आज शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो शिकला तो मोठा झाला असं नेहमीच म्हटलं जातं, पण जगासमोर स्वत:ला सिद्ध करण्यापूर्वी प्रत्येकाला शिक्षण व्यवस्थेच्या दिव्यातून बाहेर पडावं लागतं. आज शिक्षणाचा बाजार झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांसोबत पालकही होरपळत आहेतच. पण, एखाद्या खेडय़ातील शाळेत प्रामाणिक ज्ञानदानाचं कार्य करणाऱया शिक्षकांचीही या चक्रव्यूहातून सुटका झालेली नाही. दिग्दर्शक द्वयींनी हाच धागा पकडून आजवर कधीही समोर न आलेलं कथानक ‘कॉपी’च्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलं आहे. खेडय़ातील शाळांमधील कथानक सादर करत आज महाराष्ट्रातील शाळांमध्ये कशाप्रकारचा कारभार सुरू आहे त्याचं ज्वलंत चित्रच त्यांनी मोठय़ा पडद्यावर रेखाटलं आहे. एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस सिने फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव, 55 व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा तसेच इतर नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणं हे कॉपीचं आणखी एक वैशिष्टय़ आहे.

आजवर विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता अंशुमन विचारे या चित्रपटात शिक्षकाच्या काहीशा गंभीर भूमिकेत दिसणार आहे. आजपर्यंत बऱयाचदा पोलिसी भूमिकेत दिसलेले जगन्नाथ निवंगुणे यांनीही शिक्षकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या दोघांना मिलिंद शिंदे, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, नीता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत, अदनेश मदुशिंगरकर, प्रतिक लाड, रोहित सोनावणे, प्रतिक्षा साबळे, शिवाजी पाटणे, सिकंदर मुलानी, आरती पाठक, सिद्धी पारकर, सानिका निर्मल, सिद्धी पाटणे आणि विद्या भागवत आदी कलाकार या चित्रपटात आहेत. राहुल साळवे यांनी गीतलेखन केलं आहे. नव्या दमाचे संगीतकार अशी ख्याती असणाऱया रोहन-रोहन यांच्या जोडीला वसंत कडू यांनी या चित्रपटातील गीतांना संगीत दिलं आहे.

Related posts: