|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » पावसाने टाळला पाकचा संभाव्य पराभव

पावसाने टाळला पाकचा संभाव्य पराभव 

वृत्तसंस्था/  सिडनी

यजमान ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या रविवारी येथे पहिल्या टी-20 सामन्यात पावसाने पाकचा संभाव्य पराभव टाळला. या सामन्यावेळी पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी डक वर्थ लेविस नियमाच्या आधारे 15 षटकांत 119 धावांचे उद्दिष्ट ऑस्ट्रेलियाला दिले पण ऑस्ट्रेलियाने बिनबाद 41 धावा जमविल्या असताना पुन्हा पावसाला जोरदार प्रारंभ झाल्याने हा सामना अर्धवट स्थितीत रद्द करावा लागला. तत्पूर्वी पाकने 15 षटकांत 5 बाद 107 धावा जमविल्या होत्या. पंचांनी ह सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला होता.

अलिकडेच ऑस्ट्रेलियाने लंकेचा 3-0 असा टी-20 मालिकेत व्हाईटवॉश केला होता. या मालिकेसाठी सर्फराजला कर्णधारपदावरून वगळून बाबर आझमकडे नेतृत्व देण्यात आले होते. या पहिल्या सामन्यावेळी सुरूवातीपासूनच पावसाळी वातावरण जाणवत होते. खेळाला उशिरा प्रारंभ होत असल्याने पंचांनी हा सामना प्रत्येकी 15 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली.

कर्णधार बाबर आझमने दमदार फलंदाजी करत नाबाद 59 धावा जमविताना 38 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकार ठोकले. पाकच्या डावाला मात्र चांगली सुरूवात झाली नाही. स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर फक्र झमान स्टीव्ह स्मिथकरवी झेलबाद झाला. त्यानंतर हॅरीस सोहेल धावचीत झाला. पाकची स्थिती यावेळी 2 बाद 10 अशी होती. कर्णधार बाबर आझम आणि रिझवान यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 10 षटकांत पाकने 2 बाद 64 धावा जमविल्या होत्या. ऍगेरच्या चेंडूवर रिझवान कमिन्सकरवी झेलबाद झाला. त्याने 31 धवा जमविल्या. 13 षटकांत पाकने 3 बाद 88 धावा जमविल्या होत्या. पुन्हा पावसाचा अडथळा आला पण पाऊस थांबल्यानंतर पाकच्या डावाला पुढे प्रारंभ झाला आणि असिफ ऍली 11 धावांवर बाद झाला. रिचर्डसनने त्याला बाद केले. स्टार्कने इमाद वासीमला खाते उघडण्यापूर्वीच बाद केले. बाबर आझमने टी-20 प्रकारातील आपले 11 वे अर्धशतक झळकविले. 15 षटकाअखेर पाकने 5 बाद 107 धावा जमविल्या. बाबर आझम नाबाद 59 धावा झळकविल्या.

पाकच्या डावानंतर केवळ 10 मिनिटांच्या अंतराने ऑस्ट्रेलियाच्या डावाला प्रारंभ झाला. पहिल्या 3.1 षटकांत फिंचने 37 धावा झोडपल्या दुसऱया बाजूने डेव्हिड वॉर्नर केवळ 2 धावांवर नाबाद राहिला. पुन्हा पावसाला प्रारंभ झाल्याने हा सामना रद्द करावा लागला. आणखी 11 चेंडूचा खेळ झाला असता तर कदाचीत या सामन्याचा निकाल पहावयास मिळाला असता पण शेवटी पावसाने पाकला संभाव्य पराभवापासून वाचविले. या मालिकेतील दुसरा सामना कॅनबेरा येथे येत्या मंगळवारी आणि त्यानंतर अंतिम सामना पर्थमध्ये खेळविला जाईल.

इरफान वयस्कर गोलंदाज

 पाकतर्फे 1992 साली इम्रान खान हा सर्वात अधिक वयस्कर गोलंदाज ठरला होता. पण आता मोहम्मद इरफानने इम्रान खानचा हा विक्रम मागे टाकला आहे. आता पाकतर्फे सर्वाधिक वयाचा वेगवान गोलंदाज इरफान ठरला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यातील रविवारी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात मोहम्मद इरफानचे वय 37 वर्षे आहे. 1992 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत माजी कर्णधार  आणि पाकचा विद्यमान पंतप्रधान इम्रान खानचे वय 39 वर्षे होते. 1955 साली भारताविरूद्धच्या सामन्यात पाकच्या मिरान बक्षचे वय 47 वर्षे होते.

Related posts: