|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » फिनिशिंग, बचाव भक्कम करण्याची गरज

फिनिशिंग, बचाव भक्कम करण्याची गरज 

पुरुष हॉकी संघाचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

ंटोकियो ऑलिम्पिकमध्ये अपूर्ण राहिलेले कार्य यशस्वीपणे पूर्णत्वास नेण्यासाठी भारताच्या पुरुष हॉकी संघातील स्ट्रायकर्सनी फिनिशिंग कौशल्य आणि भक्कम बचावात सुधारणा करण्याची गरज आहे, असे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना वाटते.

येथे झालेल्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता लढतीत त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली भारताने रशियाचा दोन्ही सामन्यात पराभव करून ऑलिम्पिक पात्रता मिळविली. ऑस्ट्रेलियन संघाचे सदस्य असताना रीड यांनी 1992 च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये रौप्य मिळविले होते. पण प्रशिक्षक म्हणून त्यांची कारकीर्द तितकीची फलदायी ठरली नाही. 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये त्यांचा संघ उपांत्यपूर्व फेरीतच स्पर्धेबाहेर पडला होता.

‘माझे काम अद्याप अपूर्णच आहे. ऑलिम्पिकमध्ये पोडियमवर येण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडू पाहतो. सुदैवाने एक खेळाडू म्हणून मी एक पदक मिळविले असून त्या आठवणी अजूनही ताज्या आहेत,’ असे रीड यांनी भारताने पात्रता मिळविल्यानंतर म्हटले होते. आठवेळचे चॅम्पियन असलेल्या भारताने रशियाचा दोन लढतीत मिळून 11:3 अशा गोलफरकाने पराभव केला. ‘अशा आठवणी भारतीय संघातही आणण्यासाठी मी प्रयत्नशील असून टोकियोमध्ये आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत,’ असेही ते म्हणाले. ‘अजून नऊ महिन्याचा वेळ आपल्याकडे असल्याचे सर्व खेळाडूंना सांगितले असून वेळ जवळ येईल तसे अधिकाधिक सुधारणा करणे, हीच आपली योजना आहे. या प्रक्रियेवर आम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करणार असून अपेक्षित निकाल आपणहून मिळत जातील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

आगामी काळात सर्व खेळाडू आपले कौशल्य पॉलिश करण्यावर भर देतील. फिनिशिंग कौशल्यात अजून सुधारणा होण्याची गरज आहे. आम्ही अनेक संधी निर्माण करतोय, ही चांगलीच बाब आहे. पण त्याचा चांगला परतावा मिळणेही आवश्यक आहे. त्याचप्रमाणे खोलवरील बचाव आणखी भक्कम होण्याची गरज आहे. कारण आपल्याकडून प्रतिस्पर्ध्यांना अनेक संधी दिल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

तयारीसाठी प्रो लीग उपयुक्त ठरेल : रीड

गेल्या वर्षी पहिल्या एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेतून भारताने माघार घेतली  होती. या स्पर्धेची दुसरी आवृत्ती पुढील वर्षी जानेवारीत होणार असून भारताचा पदार्पणाचा सामना नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. अव्वल संघांविरुद्ध खेळल्यास भारतीय संघाची ऑलिम्पिकची चांगली तयारी होऊ शकेल, असे रीड यांना वाटते. प्रो लीग उपयुक्त ठरणारी स्पर्धा असून तयारीचा हेतू साध्य त्यातून साध्य होऊ शकतो. आपल्याकडे 33 खेळाडूंचा संच असून तो 32 चा होणार आहे. प्रो लीग ही एक मोठी संधी असून त्यात बरेच सामने होणार असल्याने विविध खेळाडूंना आजमावून पाहता येणार आहे. यामुळे खेळाडूंची तयारीही उत्तम होईल आणि ऑलिम्पिकसाठी सज्ज होतील,’ असे रीड म्हणाले. पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या महिला संघाचे अभिनंदन केले. महिला संघाने अमेरिकेचा 6-5 असा पराभव केला. ‘महिला संघ चार गोलांनी मागे पडला होता. पण कठोर परिश्रम करीत अखेरच्या मिनिटाला एक गोल नोंदवून अमेरिकेला मागे टाकत यश मिळविले, त्या खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत,’ असे मनप्रीत म्हणाला.

Related posts: