|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अतिवृष्टी बाधित गावातील पिकांची पालकमंत्री शिवतारेंकडून पाहणी

अतिवृष्टी बाधित गावातील पिकांची पालकमंत्री शिवतारेंकडून पाहणी 

प्रतिनिधी/ सातारा

अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेती व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी फलटण तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन शेतकऱयांच्या शेतावर जावून बाधित पिकांची पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱयांना लवकरात लवकर योग्य ती मदत दिली जाईल, असे पालकमंत्री शिवतारे यांनी सांगितले.

  पालकमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी फलटण तालुक्यातील कापडगाव, तरटगाव, काळज येथील शेतात जावून पिकांची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.

   यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, तहसीलदार हणमंत पाटील आदी उपस्थित होते.

    पालकमंत्री शिवतारे यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे कांदा, सोयाबीन, मका, ऊस शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच फळबागांचेही विशेषत: द्राक्ष आणि डाळींब पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे सोमवारपर्यंत पंचनामे करुन त्यांची पूर्णपणे पाहणी करुन मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना अधिकाऱयांना दिल्या असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद रोड, तलाव, विहिरी, इतर सर्व नुकसानीचे पंचनामेही संबंधित अधिकाऱयांनी करावेत आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मंगळवारपर्यंत अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही दिल्या असल्याचे सांगितले. जे-जे पंचनामे होतील व त्यांच्या  कागदपत्रांची पूर्तता होईल तशी शेतकऱयांना ताबडतोब मदत दिली जाईल,  नुकसान झालेल्या सर्वांना मदत दिली जाईल, असेही शिवतारे यांनी यावेळी सांगितले.::

Related posts: