माहेश्वरी फाऊंडेशन : दिवाळी स्नेहमेळावा, अन्नकोट महोत्सव साजरा

ऑनलाईन टीम / पुणे :
माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव नुकताच साजरा झाला. लोकांच्या रक्षणाकरिता करंगळीवर पर्वत उचलून धरणाऱया प्रसंगांची आठवण म्हणून गोवर्धन गिरिधारीचे पूजन आणि 56 भोगाची (मिठाई व इतर पदार्थ) आरास करण्यात आली. या अन्नकोट महोत्सवात शहर व जिह्यातील जवळपास चार हजार माहेश्वरी बांधवांसह इतर समाजातील मान्यवर व भक्तगण सहभागी झाले होते.
पावसामुळे काहीसा परिणाम झाला असला, तरी माहेश्वरी समाजातील लोकांचा उत्साह होता. 56 प्रकारच्या भोगामध्ये मिठाई, फळे, दिवाळी फराळ आदी पदार्थ ठेवण्यात आले होते.
कोंढवा येथील महेश सांस्कृतिक भवनात झालेल्या या महोत्सवावेळी माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनचे अध्यक्ष धनराज राठी, सचिव संजय चांडक, कोषाध्यक्ष श्रीप्रकाश बागडी, सल्लागार हिरालाल मालू, संजय बिहानी, बालाप्रसाद बजाज, राजेंद्र भट्टड, मदनलाल भुतडा, हरी भुतडा, शामसुंदर कलंत्री आदी उपस्थित होते.
सचिव संजय चांडक म्हणाले, गोवर्धन गिरिधारी यांच्या आठवणीतील पवित्र दिवस म्हणून अन्नकोट महोत्सव साजरा होतो. दरवषी माहेश्वरी समाजबांधव एकत्र येऊन दिवाळी स्नेहमेळावा व अन्नकोट महोत्सव साजरा करतात. माहेश्वरी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पुण्यात औषधोपचार व अन्य कामांसाठी बाहेरून येणाऱया समाजबांधवांच्या सोयीसाठी शहराच्या मध्यवर्ती मुकुंदनगर या भागात अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त सॅनेटोरियम, अतिथीगृह आणि बहुउद्देशीय प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले असून, लवकरच त्याचे लोकार्पण केले जाणार आहे.