|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा नाही : संजय राऊत

सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा नाही : संजय राऊत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटावा म्हणून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत आणि रामदास कदम यांनी आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना संजय राऊत म्हणाले, ही एक सदिच्छा भेट होती. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. सरकार स्थापनेत शिवसेना अडथळा ठरत नाही. त्यामुळे लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं अशी मागणी केली आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.

संजय राऊत म्हणाले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटलो.  भेट घेऊन आम्ही राज्यपालांना बाळासाहेब ठाकरे यांचं फटकारे आणि उद्धव ठाकरे यांची दोन पुस्तके भेट दिली. त्यांनी दोन्ही पुस्तकांचं कौतुक केलं. एका अमर्यादेत राहुनच आमच्यात चर्चा झाली. खुप दिवसांनंतर राज्याला कायद्याची आणि राजकारणाची जाण असलेले राज्यपाल भेटले आहेत, असं ते म्हणाले.

या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हायला हवं, असे शिवसेनेला वाटत असल्याची बाब आम्ही राज्यपालांपुढे ठेवल्याचेही राऊत म्हणाले. सरकार स्थापन व्हायला का उशीर होतोय हे माहीत नाही मात्र सरकार स्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडसर नसल्याचेही आम्ही राज्यपालांना सांगितल्याचे राऊत म्हणाले.

 

Related posts: