|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सरकारसाठी शिवसेनेचा अडथळा नाही!

सरकारसाठी शिवसेनेचा अडथळा नाही! 

शिवसेनेने राज्यपालांपुढे मांडली भूमिका

संजय राऊत, रामदास कदमांनी घेतली भेट

राज्यपालांना बाळासाहेबांचे पुस्तक भेट

मुंबई / प्रतिनिधी

राज्यात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन व्हावे, अशी विनंती करतानाच सरकारच्या स्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडथळा नसल्याची भूमिका राज्यपालांसमोर मांडण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोमवारी दिली. राज्यपालांच्या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्यासह शिवसेना नेते रामदास कदम यांनी सोमवारी राजभवनावर जाऊन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी राज्यपालांची आजची सदिच्छा भेट होती, असे सांगितले. या भेटीत राजकीय स्थितीवर चर्चा झाली. राज्यपाल हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात. त्यांना घटनेनुसार काम करावे लागते. त्यामुळे एका मर्यादेत राहून चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

राज्यपालांना आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावतीने शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांचे फटकारे तसेच उध्दवजींचे ‘पहावा विठ्ठल’ आणि महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांशी संबंधित पुस्तक भेट दिले. ही पुस्तके राज्यपालांनी चाळली आणि त्यांना ती आवडल्याचे राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात एकप्रकारची संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. अजून सरकार अस्तित्वात आलेले नाही. या स्थितीला शिवसेना जबाबदार नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. सध्या महाराष्ट्राला जे राज्यपाल लाभले आहेत त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. राजकारण आणि कायद्याची त्यांना जाण आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यपालांच्या भेटीनंतर राऊत हे ‘मातोश्री’ला गेले आणि राज्यपालांसोबत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्याचे समजते.

Related posts: