नवीन सरकार निश्चित बनणार : फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट
महायुतीचा उल्लेख टाळला
नवी दिल्ली / प्रतिनिधी
सत्तेच्या नव्या समीकरणाबाबत कोणी काही बोलत असेल तर त्यावर मी किंवा भाजपमधील कोणीही प्रतिक्रिया देणार नाही. पण राज्याला नवीन सरकारची गरज असून ते निश्चितच बनेल याबद्दल आम्ही आश्वस्थ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील बहुतांश भागाला अवकाळी पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱयांना केंद्र सरकारने मदत करावी म्हणून फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र, त्यांनी शिवसेना-भाजप महायुती सरकारचा उल्लेख टाळला.
दरम्यान, महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती केंद्राला देण्यात आली. यासंदर्भातील केंद्राच्या समितीचे अध्यक्ष म्हणून गृहमंत्री काम पाहतात. त्यामुळे अमित शहा यांना शेतीच्या नुकसानीची विस्तृत माहिती देण्यात आली. या माहितीनंतर केंद्राकडून महाराष्ट्राला नक्कीच मदत मिळेल. चर्चेवेळी गृहमंत्र्यांनी विविध खात्यांच्या सचिवांना सूचना केल्या. तसेच केंद्राचे पाहणी पथक लवकरच महाराष्ट्रात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस आणि शहा यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा आणि शिवसेनेची भूमिका यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
शिवसेनेचे सरकार येणार : जयंत पाटील
दरम्यान, राज्यात भाजपचे नव्हे तर शिवसेनेचे सरकार येणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मुंबईत वर्तवले. भाजपने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ आणि त्यांना पुन्हा निवडून आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सरकार स्थापन करण्याची शक्यता वाढली आहे.