|Thursday, November 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

यावर्षी कार्तिकस्वामी दर्शनाचा विशेष योग नाही

बुध. दि. 6 ते 12 नोव्हेंबर 2019

यावर्षी कार्तिकस्वामी दर्शनाचा योग केव्हा आहे, असे अनेकांनी  विचारलेले आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र असेल तरच तो अमृतमय लक्ष्मीयोग होतो व मनुष्य धनवान होतो व त्याला त्याच्या अंगिकृत कार्यात यश मिळते. साधारणपणे ज्यावषी अधिक महिना येतो, त्यावर्षी  कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो, असे पंचांगकर्ते दाते यांच्या ‘आचारधर्म’ या पुस्तकात नमूद केलेले आहे. यावषी 12 नोव्हेंबरला पौर्णिमा व त्या दिवशी भरणी नक्षत्र आहे. पौर्णिमा सायंकाळी 7.04 वाजता संपते व त्यानंतर रात्री 8.59 वाजता कृत्तिका नक्षत्र लागते. पौर्णिमेला कृत्तिका नक्षत्र नसल्याने यावषी कार्तिकस्वामी दर्शनाचा लाभदायक योग नाही. त्यामुळे असा योग नसताना दर्शन घेऊनही त्याचा फायदा नाही. पण त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने त्या दिवशी श्री शिवलीलामृत ग्रंथाचे 11 व 13 हे अध्याय वाचावेत, त्याचा चांगला अनुभव येईल. या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे याला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ म्हणतात. आपण कितीही कष्टाळू अथवा हुशार असू. पुण्याई नसेल तर यश मिळत नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. इंजिनियरिंग, मेडिकल अथवा इतर क्षेत्रात पीएचडीपर्यंत शिक्षण घेतलेले उच्चविद्याविभूषित लोक नोकरी, व्यवसाय मिळत नाही म्हणून वणवण भटकताना अथवा साधीसुधी कामे करताना दिसतात. काही दवाखान्यात आठ-आठ दिवस एकही पेशंट नसतो. कोटय़वधीच्या इमारती बांधूनही हवे तसे गिऱहाईक येत नाही. काही जणांच्या हाती साधी सायकलही नसते तर याच्या उलट काहीही  शिक्षण नसताना रुप, सौंदर्य नसताही पटापट लग्ने होतात, काहीजणांना पैसा मोजायला वेळ नसतो, घरबसल्या नोकऱया चालून येतात, घर-बंगला, गाडी, विमान प्रवास, परदेश प्रवास यासह सर्व तऱहेचे ऐश्वर्य  काही जणांच्या पायाशी लोळत असते. एकाच घरात एखादी व्यक्ती ज्यात हात घालेल त्यात नेत्रदीपक यश मिळवून मालामाल होते. तर त्याच घरातील इतर व्यक्तीना मात्र काहीही यश मिळत नाही. घर, गाडी, बंगला, श्रीमंती,नावलौकिक, प्रसिद्धी, निर्क्यसनीपणा, योग्यता नसताना चांगले स्थळ मिळून लग्न होणे अथवा मोठय़ा पगाराची नोकरी मिळणे, या गोष्टी पूर्वपुण्याईशिवाय साध्य होत नाहीत. प्रयत्नांशिवाय काहीही मिळणार नाही हे खरे असले तरी दैवीकृपेशिवाय अंगिकृत कार्यात यश मिळत नाही, हेही तितकेच खरे आहे. त्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही   विशिष्ट मुहूर्तवर विशिष्ट पूजा, देवदर्शन उपास-तपास, तीर्थयात्रा, थोरामोठय़ांचे आशीर्वाद, कुलदेवतेची उपासना यासह अनेक उपाय योजना सांगितलेल्या आहेत. आपले प्रयत्न योग्य दिशेने व प्रामाणिकपणे चालू असतील तर देवालाही यशाचे माप देणे भाग पडतेच. कार्तिकस्वामींच्या दर्शनाचे 10-15 योग आहेत, त्यांची माहिती पुढे केव्हा तरी दिली जाईल. यावषी मात्र दर्शनाचा योग नाही, हे लक्षात ठेवावे.

मेष

रवि, मंगळ, बुध सप्तमात आहेत. व्यापारी चढाओढीमुळे मन बेचैन राहील. देण्या-घेण्याच्या व्यवहारात फारसा लाभ होणार नाही. प्रवास व पत्रव्यवहार या बाबतीत हा आठवडा चांगला जाईल. जुनी येणी वसूल होतील. जीवनाला कलाटणी देणाऱया शुभकार्याची सुरुवात या आठवडय़ात होईल. एखादे महत्त्वाचे काम होईल. कोणतेही काम कितीही अवघड असले तरी त्यात यश मिळू शकेल.


वृषभ

गुरुची पूर्ण शुभदृष्टी धनस्थानावर आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. अडलेल्या बऱयाच आर्थिक कामांना गती मिळेल. मित्रमंडळी पुन्हा जवळ येऊ लागतील, पण आपले कोण परके कोण हे ओळखणे महत्त्वाचे. मोबाईलमुळे झालेले गैरसमज निवळतील. हाती पैसा खेळू लागेल. एखाद्या सरकारी कामासाठी प्रवास करावा लागेल.


मिथुन

सप्तमस्थ गुरुमुळे काही महत्त्वाचे फेरबदल या आठवडय़ात अपेक्षित आहेत, जे तुमचे जीवन बदलून टाकतील. वैवाहिक जीवन तसेच नोकरी व्यवसायातील अडलेली कामे होऊ लागतील. कोर्टप्रकरण सुरू असेल तर तुमची सरशी होईल. हव्या त्या ठिकाणी बदली होऊ शकेल. घरातील वातावरण आनंदी व समाधानी राहील.


कर्क

व्यवसाय व धनस्थानावर गुरुची कृपा असल्याने सर्व कामात यश देणारे ग्रहमान आहे. तुमची कार्यक्षमता वाढवा. शिस्तबद्ध राहून जमा खर्च नीट ठेवा. हा आठवडा तुम्हाला फार मोठे यश देऊ शकेल. अत्यंत अवघड व्यावहारिक कामे पूर्ण करू शकाल. आरोग्य विषयक गंभीर समस्या दूर होतील. तसेच आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ लागतील.


सिंह

चंद्र, गुरु शुभयोगामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. आर्थिक घडी व्यवस्थित बसेल.रखडलेले महत्त्वाचे काम या आठवडय़ात होईल. आर्थिक स्थिती समाधानकारक तसेच दीर्घकाळ दूर असलेल्या व्यक्तींची भेट होईल. धनलाभाच्या दृष्टीने ग्रहमान चांगले आहे. एकाच वेळी अनेक नोकऱयाचे कॉल येतील.


कन्या

गुरु केंद्रात आल्याने घर, जागा, वाहन वगैरे स्वप्ने पूर्ण करू शकाल. लग्नासाठी तीन चार स्थळांनी एकाचवेळी होकार दिल्यामुळे गोंधळात पडाल. नोकरी व्यवसायातील ताणतणाव कमी होईल. एखादी नवी जबाबदारी पडेल. प्रमोशनच्या संधीही येतील, पण कामाच्या दगदगीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.


तूळ

आर्थिक व वैवाहिक समस्या सुटतील. लिखाणाची आवड असेल तर त्यात यश मिळेल. स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून जी कामे कराल, त्यात यश मिळवाल. भागीदारी व्यवसाय असेल तर भरभराटीचे योग. आत्मविश्वास असेल तर ते सोनेरी फळही देणारे ग्रहमान आहे. शुक्राच्या कृपेमुळे आर्थिक स्थिती चांगली ठरेल.


वृश्चिक

धनस्थानातील गुरुमुळे आर्थिक सुधारणांची सुरुवात झालेली दिसेल. हाती पैसा टिकू लागेल. पण तरीही आपण चांगले असलो तरी समोरुन येणाऱयाचा भरवसा नसतो. त्यामुळे तुम्ही सावधानतेने वागले पाहिजे. खर्च, कमाई व नियोजन यांचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करा. हा आठवडा तुम्हाला मोठे यश प्रदान करील. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर यशस्वी व्हाल.


धनु

गुरु तुमच्या राशीत आल्याने यापूर्वीच्या सर्व अडचणी कमी होऊ लागतील. भांडणे अथवा इतर प्रकरणात कोणत्याही प्रकारची मध्यस्थी करू नका. निष्कारण शत्रुत्व ओढवेल. पूर्वी जर कुणाशी मतभेद असतील तर ती प्रकरणे परस्पर मिटविण्याचा प्रयत्न करा. धाडसाने केलेले कोणतेही व्यवहार यशस्वी ठरतील. पण मित्रमंडळींच्या काही कारवाया व थट्टामस्करीमुळे गोत्यात येण्याची शक्मयता आहे.


मकर

हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय चांगला ठरेल. देव देत असतो पण त्याचा चांगला वापर झाला नाही तर ती चूक तुमची ठरेल. गुरुचे आध्यात्मिक पाठबळ चांगले आहे. ध्यानधारणा, परदेश प्रवास, महत्त्वाच्या कामासाठी तडजोड करण्यास अनुकूल काळ, पण आर्थिक बाबतीत जरा जपून रहावे लागेल. आरोग्याच्या बाबतीत पित्तप्रकृती असलेल्यांनी काळजी घ्यावी.


कुंभ

लाभस्थ गुरुमुळे अनेक ग्रहमान समस्या चुटकीसरशी सुटतील. वैवाहिक जीवनातील बऱयाच अडचणी कमी होऊ लागतील. मुलाबाळांचे सौख्य लाभेल. आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. काही महत्त्वाच्या कामासाठी ठरवलेल्या व्यक्ती योग्य ठरतील. संततीच्या उत्कर्षाच्या दृष्टीने ग्रहमान अतिशय चांगले आहे. गुरुकृपेमुळे निपुत्रिकांना संततीची चाहूल लागेल.


मीन

नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने भाग्यशाली योग. बढती, बदली व योग्य ठिकाणी काम करण्याची संधी प्राप्त होईल. राशीस्वामी गुरु बलवान आहे. वास्तू संदर्भातील अडचणी दूर होतील. स्वत:चे वाहन,  वास्तू वगैरे होण्याच्या दृष्टीने चांगले योग. वडिलांचे आरोग्य सुधारू लागेल. सरकारी कामे, संततीचा भाग्योदय, आरोग्य तसेच कोर्टकचेऱयांच्या कामात चांगले यश मिळेल.


 

Related posts: