|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » सागरी पातळीचा भारताला सर्वाधिक धोका

सागरी पातळीचा भारताला सर्वाधिक धोका 

संयुक्त राष्ट्रसंघ महासचिवांचा इशारा

वृत्तसंस्था/  बँकॉक

 संयुक्त राष्ट्रसंघ महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी हवामान बदलाच्या धोक्यांबद्दल भारताला सतर्क केले आहे. हवामान बदलामुळे सागराची पातळी अनुमानापेक्षाही अधिक वेगाने वाढत आहे. भारत, जपान, चीन आणि बांगलादेशला या कारणामुळे सर्वाधिक धोका आहे. हवामान बदलामुळे होणारे परिवर्तन सरकारकडून ते रोखण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांपेक्षा अधिक गतिमान असल्याचे गुतेरेस यांनी बँकॉक येथील आयोजित परिषदेत म्हटले आहे.

गुतेरेस यांनी अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या क्लायमेट सेंट्रलच्या अहवालाचा दाखला दिला आहे. सागराची वाढती पातळी 2050 पर्यंत यापूर्वी अनुमानित आकडय़ांपेक्षाही तीन पट अधिक लोकसंख्येला (दीड अब्ज लोकांना) प्रभावित करू शकते. सागराच्या पातळीमुळे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा मोठा भाग पाण्याखाली जाऊ शकतो. हवामान बदल हा सद्यकाळातील पृथ्वीसाठी सर्वात मोठा धोका आहे. सर्व लोकांनी एकत्र येत प्रयत्न सुरू केल्याशिवाय हा धोका टाळता येणार नसल्याचे गुतेरेस म्हणाले.

पृथ्वीचे वाढते तापमान रोखावे लागेल असे वैज्ञानिकांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 2050 पर्यंत आम्हाला कार्बन न्यूट्रल व्हावे लागणार असून याकरता पुढील दशकात कर्बवायू उत्सर्जनात 45 टक्क्यांपर्यंत घट करावी लागणार असल्याचे गुतेरेस यांनी म्हटले आहे.

हे लक्ष्य गाठण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सर्व देशांना याकरता कर्बवायूचा वापर रोखावा लागणार असून जीवाश्म इंधनावरील अनुदान बंद करावे लागणार आहे. तसेच कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्पही थांबवावे लागतील. पूर्व, दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशियात कोळशाने कार्यान्वित होणाऱया नव्या ऊर्जा प्रकल्पांना भविष्य म्हणून पाहिले जात आहे. हवामान बदलाच्या धोक्याला तोंड देणाऱया देशांना कोळशाचा वापर संपुष्टात आणावा लागणार असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.

Related posts: