|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » चिनी शस्त्रास्त्रांमध्ये गुणवत्तेचा अभाव

चिनी शस्त्रास्त्रांमध्ये गुणवत्तेचा अभाव 

अमेरिकेच्या तज्ञाचा दावा :

वृत्तसंस्था/  न्यूयॉर्क

 शस्त्रास्त्र निर्मितीच्या शर्यतीत चीन अत्यंत वेगाने सहभागी होत असला तरीही त्याच्या शस्त्रास्त्रांमध्ये गुणवत्तेचा अभाव असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. शस्त्रास्त्रांच्या विक्रीत चीन पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि जर्मनी हेच देश याप्रकरणी चीनपेक्षा आघाडीवर आहेत. शस्त्रास्त्र व्यवहार प्राप्त करण्यासाठी चीन लाच देतो तसेच व्यवहारावर शिक्कामोर्तब झाल्यावरही हेरगिरीचे काम करत असल्याचा आरोप चीनवर होतोय.

अमेरिकेच्या पॉलिटिकल-मिलिट्री अफेयर्सचे सहाय्यक सचिव क्लार्क कूपर यांनी वॉशिंग्टन येथे आयोजित एका कार्यक्रमात चिनी आणि रशियन शस्त्रास उत्पादकांवर जोरदार टीका केली आहे. किमतीत घट करणे आणि लाच देत चीन व्यवहार प्राप्त करत आहे. स्वतःचे स्थान निर्माण झाल्यावर चीन स्वतःच्या ग्राहकाचा अनुचित लाभ उचलत असून स्वतःसाठी हेरगिरीचेही काम करत असल्याचा आरोप कूपर यांनी केला आहे.

शस्त्रास्त्र खरेदीदारांना इशारा

कूपर यांनी जगातील शस्त्रास्त्र खरेदीदारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सत्य जगासमोर आहे, जॉर्डनने 2016 मध्ये चीनकडून 6 मानवरहित विमानांची खरेदी केली होती. 3 वर्षांनी जॉर्डनची ही यंत्रणा अपेक्षित कामगिरी करत नसल्याचे उघ्ड झाले आहे. चिनी यंत्रणा जॉर्डनकडून हटविली जात असल्याचा दावा कूपर यांनी केला आहे. चीनने सीएच-4 युसीएव्ही अल्जीरिया, इजिप्त, सौदी अरेबिया, इराक आणि युएईला विकल्या होत्या. इराकचे सैन्य 10 पैकी केवळ एका विमानाचा वापर करत आहे. बहुतांश देश देखभालीची तक्रार करत आहेत.

चीनकडून खरेदीदारांची हेरगिरी

2014 मध्ये चीनने सीएच-4एस ही यंत्रणा सादर केली होती. आतापर्यंत 30 सीएच-4एस विमानांची विक्री झाली आहे. एका विमानाची किंमत सुमारे 40 लाख अमेरिकन डॉलर्स असून अमेरिकेच्या ड्रोनची किंमतही इतकीच असते. दोन्ही देशांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेत मोठा फरक आहे. जगभरात स्वतःच्या विमानाची कामगिरी उत्तम राहिल्याचा दावा चीन करत आहे. पण चीनला स्वतःच्या ग्राहक देशांबद्दल गुप्त तपशील मिळतो कसा हा प्रश्न निर्माण होत असल्याचे कूपर म्हणाले.

Related posts: