|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » हापूस उत्पन्नात मोठी घट शक्य

हापूस उत्पन्नात मोठी घट शक्य 

यंदा आंबा हंगाम 40 दिवस लांबणार : वादळ, पावसाचा मोठा परिणाम

आंबा बागायतींवर अनेक रोगांचे सावट

हवेतील आद्रता, जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढले

तुडतुडे, कीड रोगाचा होणार मोठा परिणाम

प्रशांत वाडेकर / देवगड:

‘क्यार’ या चक्रीवादळामुळे अवेळी झालेल्या पावसाने भातशेतीबरोबरच हापूस आंबा बागायतींवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. हवामानात झालेला मोठा बदल आंबा पिकासाठी मारक ठरत आहे. हवेत आद्रतेचे व जमिनीमधील पाण्याचे प्रमाण वाढल्याने आंबा कलमांना पुन्हा पालवी येऊ लागली आहे. तसेच आलेल्या पालवीला करपा रोगाचा व तुडतुडय़ांचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागल्याने आंबा बागायतींवरील फवारण्यांच्या आर्थिक ताणामुळे आंबा बागायतदारांचे चांगलेच कंबरडे मोडणार आहे. एकंदरीत वातावरणाचा परिणाम पाहता यावर्षीचा आंबा हंगाम हा सुमारे 35 ते 40 दिवस पुढे जाण्याची शक्यता आहे. हंगाम लांबला तर उत्पादन वाढेल मात्र दर मिळणार नसल्याने उत्पन्न घटणार आहे.

क्यार चक्रीवादळादरम्यान सिंधुदुर्ग जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला. सिंधुदुर्गात हापूस आंब्याचे सर्वाधिक उत्पादन देवगड तालुक्यात घेतले जाते. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंबा बागायतींना बसला आहे. वादळादरम्यान झालेल्या पावसामध्ये एकाच दिवशी सुमारे 200 मि. मी. इतका पाऊस देवगड तालुक्यात पडला आहे. खऱयाअर्थाने आंबा हंगामाला सप्टेंबर मध्यापासून सुरुवात होते. सप्टेंबरमध्ये आलेल्या पालवीला ऑक्टोबरमध्ये मोहोर येण्यास सुरुवात होते. मात्र, वातावरणातील बदलामुळे आंबा बागायतींमध्ये पालवी प्रमाण खूपच अल्प प्रमाणात दिसत आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे आंबा बागायतींवर अनेक रोगांची आक्रमणे होण्याची शक्यता आहे.

पालवी आलेल्या झाडांना करपा रोगाचा प्रादुर्भाव

याबाबत गिर्ये येथील रामेश्वर आंबा फळसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. किरण मालसे यांनी सांगितले की, क्यार या चक्रीवादळामुळे आंबा हंगामावर निश्चितच मोठा परिणाम होणार आहे. हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आहे. सकाळी 90 ते 95 तर दुपारनंतर 80 ते 85 अंश सेल्सियस इतके सध्या आदतेचे प्रमाण आहे. पाऊसही मोठय़ा प्रमाणात झाल्याने जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्या आंबा झाडांना सध्या पालवी आलेली आहे, त्या झाडांना पुन्हा पालवी येऊ लागली आहे. पालवी आलेल्या झाडांना करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कीडरोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वातावरणातील या बदलामुळे देवगड तालुक्यातून जो फेब्रुवारी व मार्चमध्ये मार्केटमध्ये जाणारा आंबा मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगाम हा 35 ते 40 दिवस लांबण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्थितीत आंबा बागायतदारांनी बुरशीनाशकांची फवारणी करणे महत्वाचे ठरेल, असेही ते म्हणाले.

तुडतुडय़ांचे प्रमाण वाढणार

देवगड येथील आंबा बागायतदार व शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष विद्याधर जोशी म्हणतात, क्यार या चक्रीवादळाने झालेल्या पावसाचा परिणाम हा आंबा बागायतींवर झाला आहे. जमिनींमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे जमिनी ओल्या आहेत. त्यामुळे आंबा झाडाला येणारी पालवी देखील उशिरा येणार आहे. 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत झाडाला पालवी येऊन मोहोर येऊ लागतो. मात्र, पालवीचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. अजूनही झाडांना पालवी यायची आहे. आंबा कलमांना पालवी येण्यासाठी जमिनीला ताण बसण्याची आश्यकता असते. आंबा झाडाला तीन प्रकारचा ताण बसतो. तो म्हणजे पाण्याचा, थंडीचा आणि खाऱया वाऱयाचा ताण बसतो. पाऊस पडल्यामुळे व खारे वारे व थंडी नसल्यामुळे झाडाला ताण बसत नाही. त्याचा परिणाम आंब्याच्या पालवीवर झाला आहे. उशिरा येणाऱया पालवीमुळे तुडतुडय़ांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. तसेच मीझ माशी, नाग अळी व शेंडे पोखरणारी अळी यांचा परिणाम आंबा झाडावर होणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांनी या कालावधीत कुटल्याही परिस्थितीत पहिली फवारणी करणे आवश्यक आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा हंगाम लांबणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.

आंबा हंगाम लांबणार

गिर्ये येथील प्रगतीशील आंबा बागायतदार मीलेश बांदकर म्हणाले, ‘क्यार’ या चक्रीवादळापूर्वी आंबा बागायतींवर किटकनाशकांची फवारणी केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवस मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला. काही आंबा झाडांना आलेला माहोर पावसामुळे व वाऱयामुळे तुटून गेला. पाऊस पडल्याने पुन्हा वातावरणात बदल झाल्याने झाडांना पुन्हा पालवी येऊ लागली आहे. पालवी आल्यानंतर किमान महिन्याभरानंतर मोहोर येतो. ‘क्यार’ चक्रीवादळोनंतर ‘महा’ चक्रीवादळाचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे आंबा बागायतदाराला या सर्व चक्रव्यूहातून जावे लागणार आहे. झाडांना पालवे येण्यास एक ते दीड महिना उशीर होणार असल्याने आंबा हंगाम लांबणार आहे. आंबा हंगाम लांबल्यामुळे एकाचवेळी आंबा उत्पादन होणार असल्याने त्याचा परिणाम आंबा दरावर होऊ शकतो. मुंबई मार्केट किंवा अन्य मार्केटमध्ये यावर्षी हापूसला चांगला दर मिळणे कठीण असल्याने आंबा बागायतदारांना मोठय़ा नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे, असेही ते म्हणाले.

आंबा पिकावर होणार परिणाम

  1. आद्रतेमुळे बुरशीचे प्रमाण वाढणार
  2. उशिरा पालवी आल्याने तुडतुडय़ांचे प्रादुर्भाव
  3. तीन प्रकारच्या कीड रोगांचा होणार परिणाम
  4. आंबा हंगाम जाणार लांबणीवर
  5. कीटकनाशक फवारणीचा खर्च वाढणार
  6. एकाचवेळी होणाऱया उत्पादनामुळे हापूसचे दर गडगडणार
  7. जास्त पाऊस आंब्यासाठी ठरणार घातक

Related posts: