|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » मुजोर ठेकेदाराला केबीनमधून हाकलले

मुजोर ठेकेदाराला केबीनमधून हाकलले 

प्रतिनिधी/ सातारा

ग्रेड सेपरटेरच्या कामाबाबत ‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याच अनुषंगाने तातडीने नगराध्यक्षा माधवी कदम यांनी बोलवण्यात आलेल्या बैठकीत बांधकामचे अभियंता, ठेकेदार आणि पालिका पदाधिकारी व नगरसेवक यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. त्यावेळी ठेकेदार सुधाकर जाधव यांनी सरळ सरळ रस्त्याच्या पॅचिंगचे काम करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. त्यावर नगरसेवक अशोक मोने हे भडकले, ते आक्रमक झाले अन् त्यांनी स्पष्ट शब्दात बाहेर जा, असे सुनावले. तसेच नगरसेवकांनीही बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच फैलावर घेतले.

या बैठकीला नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, पाणी पुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर, नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे, आरोग्य सभापती विशाल जाधव, बांधकाम सभापती सविता फाळके, ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, भाजपाचे नगरसेवक धनंजय जांभळे, मनिषा काळोखे, स्नेहा नलावडे, शेखर मोरे-पाटील, राजू भोसले, मिलिंद काकडे, उपमुख्याधिकारी संचित धुमाळ, बांधकामचे तवले, सातारा पालिकेच्या बांधकामचे अभियंता भाऊसाहेब पाटील, प्रदीप साबळे, सुधीर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नगरसेवक अशोक मोने यांनी कामाची सध्याची स्थिती काय आहे, कुठपर्यंत आले आहे काम यांची माहिती द्या, अशी मागणी केली. त्यावर बांधकामचे तवले यांनी माहिती दिली. राजू भोसले यांनी सभापती निवास येथे चेंबर उंचावर आहे, त्यामुळे वाहनधारकांना अडथळा होत आहे, असे सांगितले. शेखर मोरे- पाटील यांनी मोनार्क रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी केली. अमोल मोहिते यांनी कडक शब्दात प्रत्यक्षात जाग्यावर जावूनच पाहणी केली पाहिजे तरच नेमकी परिस्थिती समजेल, असे सांगितले.

नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पर्यायी रस्त्यांची कामे कुठपर्यंत आलेली आहेत, अशी विचारणा केली. अशा सूचनांचा पाऊस सुरु होता. बैठकीत धनंजय जांभळे यांनीही तत्काळ जाग्यावर जावूनच पाहणी करुयात, अशी मागणी केली अन् अभियंत्यांची बैठक संपवली. त्यानंतर ठेकेदारांची बैठक घेताना मात्र, ठेकेदारांनी दिवाळीपूर्वी आमची बिले काढली नाहीत. कामगारांना दिवाळी देता आली नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यावर प्रशासनाच्यावतीने आम्ही आज बिले काढली आहेत. उद्यापासून रस्त्याचे खड्डे भरायला सुरुवात करा, अशा सूचना दिल्या. त्यावर ठेकेदार सुधाकर जाधव यांनी थेट मी काम करणार नाही, असे सांगताच त्यांना थेट अशोक मोने यांनी काम बोलतोस कळते का?, बाहेर हो अशा शब्दात सुनावले. तो ठेकेदारही रागाच्या भरातच केबीनचे दार उघडून बाहेर आला. 

पाहणी अन् सूचना

ग्रेड सेपरटेरच्या कामांची पाहणी पदाधिकाऱयांनी केली. त्यावेळीही सूचना केल्या. दरम्यान, जीवन प्राधिकरणच्या दारातच गळती लागल्याने व आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तेथे सर्व पालिकेचे पदाधिकारी गेले. अभियंता संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी लगेच कार्यवाही करण्याचा सांगितले. 

अपघातग्रस्त दुचाकी चालकाच्या मदतीला धावले

पाहणी सुरु असताना मुरुड (ता. पाटण) येथील चंद्रकांत कुंभार हे साताऱयात कामानिमित्त दुचाकीवरुन आले होते. त्यांच्या पाठीमागे लावंघर (ता. सातारा) येथील महिला बसलेली होती. दुचाकी नेमकी घसरल्याची घटना सर्व पदाधिकाऱयांच्यासमोरच घडली. वेळ न दवडता विशाल जाधव यांनी दुचाकी उचलली तर धनंजय जांभळे यांनी त्या दुचाकी चालकास उठवले. नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यासह नगरसेविकांनी त्या महिलेला उठवले. किरकोळ जखमी झालेल्या महिलेला वाहतूक पोलीस अभिजीत सुतार यांनी पाणी पाजले.

Related posts: