|Friday, January 24, 2020
You are here: Home » विशेष वृत्त » ‘दशद्वार ते सोपान’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्या प्रकाशन

‘दशद्वार ते सोपान’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्या प्रकाशन 

पुणे / प्रतिनिधी :

हिंदीतील ख्यातनाम साहित्यिक हरिवंशराय बच्चन यांचे आत्मचरित्र असलेल्या ‘दशद्वार ते सोपान’ या वसंत केशव पाटील यांनी मराठीत अनुवादित केलेल्या आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेल्या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवार दि. 8 रोजी सातारा येथे होत आहे.

हिंदी साहित्यातील एक बहुरंगी व्यक्तिमत्व, हालवादी कवी, गद्य लेखक, यशस्वी अनुवादक, साक्षेपी संपादक, केंब्रिजमधून इंग्रजीची डॉक्टरेट प्राप्त करणारे पहिले भारतीय, संसद सदस्य, अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी, नेहरू कुटुंबियांचे घनिष्ठ स्नेही, अभिनयाचा सार्वकालिक मानदंड अमिताभ बच्चन यांचे वडील अशा विविध लौकिक रुपात भेटणारा एक अभिजात कलावंत म्हणजे हरिवंशराय बच्चन! ‘दशद्वार ते सोपान’ हा या संवेदनशील मनाचा गद्य आत्मसंवाद. हिंदीत त्याला सर्वोच्च सरस्वती सन्मान प्राप्त झाला. तर वसंत केशव पाटील यांच्या तितक्याच रसाळ मराठी रूपांतराने त्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त करून दिला. मराठी वाचकांनीही हे पुस्तक डोक्यावर घेतले.

संस्कृती प्रकाशनने त्याची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली असून सातारा येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेने त्याच्या प्रकाशन समारंभ व चर्चासत्राचे आयोजन केले आहे. शुक्रवार दि. 8 रोजी सायंकाळी 5 वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल, सातारा येथे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास दांडेकर यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. साहित्यिक विश्वास वसेकर, प्राचार्य सर्वश्री राजेंद्र शेजवळ, संभाजीराव मलपे, वासुदेवराव कुलकर्णी, मसापच्या कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस आदी प्रमुख पाहुणे असतील. कार्यक्रमास साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक विनायक भोसले यांनी केले आहे.

Related posts: