|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » घरकुल / नोकरी विषयक » गृहकर्ज सोबतीने घेताना…

गृहकर्ज सोबतीने घेताना… 

आज प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्य नोकरदाराला आपलं घर घेण्याचे स्वप्न हे अधुरे राहील असे वाटू लागले आहे. अशावेळेला मदतीला येत आहे को-ऍप्लीकंट ही व्यक्ति. जास्त रकमेच्या लोनसाठी को-ऍप्लीकंटचा मार्ग म्हणजे सामान्य माणसाला एक आधार वाटतो आहे. कारण एका व्यक्तीच्या कमाईवर आज जितकं लोन मिळते ते घर घ्यायला पुरेसे नसते. त्यामुळे यासाठी आई, वडील, पत्नी यांना को-ऍप्लीकंट म्हणून घेऊन आपण पुरेशा लोनची सोय करून घेऊ शकतो.

दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्मित या गृहकर्जासाठी अर्ज करू शकतात. मुख्य गोष्ट ही आहे की को-ऍप्लीकंट कोणालाही बनवले जाऊ शकत नाही. आजकाल बँका काही खास संबंधितांना किंवा नातलगांना सह अर्जदार किंवा को-ऍप्लीकंट म्हणून मान्यता देते. जवळचे नातेवाईक किंवा रक्ताचे नाते असलेले नातेवाईक आणि मित्र या खेरीज कोणत्याही नातेवाईकांना को-ऍप्लीकंट म्हणून मान्यता देता येत नाही. ज्या लोकांची कमाई नियमित आहे अशाच व्यक्तिंना तुम्ही को-ऍप्लीकंट म्हणून बरोबर घेऊ शकता. ज्या लोकांची दर महिन्याची कमाई नियमित आहे, त्यांच्या एकूण कमाईवरच लोनची रक्कम ठरते. पती आणि पत्नी यापैकी कोणीही आपल्या जोडीदाराला को-ऍप्लीकंट करून संयुक्त लोनसाठी अर्ज करू शकतात. संपत्ती दोघांपैकी कोणाच्याही नावावर होऊ शकते. मुख्य गोष्ट ही आहे की ज्या व्यक्तिंच्या कमाईवर लोन मिळते आहे तोच प्रॉपर्टीचा मालक असला पाहिजे.

वडील आणि मुलगा यांच्याबाबतीत जर मुलगा एकुलता एक असेल तर तो आपल्या वडिलांबरोबर संयुक्तपणे लोनसाठी अर्ज करू शकतो. जी प्रॉपर्टी खरेदी केली जाईल ती दोघांच्याही नावावर होईल. याबाबतीत फारसा फरक पडत नाही. कारण वडिलांच्या पश्चात ही संपत्ती मुलाच्या नावावर ट्रान्स्फर होते. पण जर एखाद्या व्यक्तीला दोन मुलं आहेत आणि वडील एका मुलाबरोबर संयुक्तपणे लोन घेऊ इच्छित असतील तर अशावेळी प्रॉपर्टीचा मालक म्हणून वडिलांचं नाव लावता येत नाही. कारण त्यांच्या मृत्यूनंतर दोन मुलांमध्ये वाद होऊ शकतो अशावेळी वडील नेहमी को-ऍप्लीकंट मानले जातील.

अविवाहित मुलीही आपल्या वडिलांशी संयुक्तपणे लोनसाठी अर्ज करू शकतात. परंतु संपत्तीचा मालकी हक्क मात्र मुलीचा असेल. त्याचबरोबर लोन घेताना वडिलांच्या कमाईचा विचार केला जात नाही. अविवाहित मुलगी आपल्या आईसोबतही संयुक्तपणे लोनसाठी अर्ज करू शकते. याबाबतीतही संपत्ती मुलीच्या नावावर राहील आणि आईच्या कमाईचा फारसा विचार केला जात नाही. लग्नानंतर कोणताही कायदेशीर प्रश्न येऊ नये म्हणून हे केले जाते.

जर पालक हा एक ऍप्लीकंट संपत्तीचा मालक असेल आणि त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर त्याच्या मुलीला एक ऍफिडेविट लिहून द्यावे लागते की ती या संपत्तीवर कोणताही दावा करणार नाही. दोन भाऊ जर एकत्र राहात असतील आणि संयुक्तपणे प्रॉपर्टी घेऊ इच्छित असतील तर किंवा एक भाऊ आणि बहीण जर संयुक्तपणे एखादी संपत्ती घेऊ इच्छित असतील तर ते लोनसाठी अर्ज करू शकत नाहीत. तसेच दोन बहिणीसुद्धा एकत्रितपणे लोनसाठी अर्ज करू शकत नाहीत. कोणत्याही अज्ञानी म्हणजेच 18 वर्षाखालील व्यक्तीला को-ऍप्लीकंट म्हणून मान्यता नाही.

सुरुवातीला लोक को-ऍप्लीकंट आणि को-ओनर यांचा एकमेकांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत असत. पण यामध्ये ही गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की को-ओनर हा एखाद्या संपत्तीचा संयुक्त मालक असतो तर को-ऍप्लीकंट हा लोन घेणाऱयाबरोबर संयुक्तपणे अर्ज करतो. को-ओनर हा एखाद्या संपत्तीचा संयुक्त मालक असतो. जर एखाद्या संपत्तीला दोन किंवा दोन पेक्षा जास्त लोक खरेदी करू इच्छित असतील तर सगळय़ा बँकांमध्ये हा नियम आहे की लोनसाठी सगळय़ा  को-ओनर्सना को-ऍप्लीकंट म्हणून प्रथम अर्ज करावा लागतो. त्याचबरोबर हेही लक्षात ठेवावं लागेल की यामध्ये कोणत्याही अज्ञान व्यक्तिला समाविष्ट करता येत नाही. एखादा को-ऍप्लीकंट हा संपत्तीचा संयुक्त मालक असलाच पाहिजे असं नाही पण हे आवश्यक आहे की संपत्तीचे सगळे मालक हे लोनसाठी को-ऍप्लीकंट मात्र असलेच पाहिजेत.

सध्याच्या काळात पती, पत्नी हे दोघंही काम करत असतात. त्यांना याचा भरपूर लाभ होऊ शकतो. ते दोघेही एकत्रितपणे को-ऍप्लीकंट होऊन या योजनेचा लाभ घेऊ शकतात. दोघंही काम करत असतील तर मोठय़ा रकमेचं लोनही त्यांना मिळू शकतं.

को-ऍप्लीकंट हे एक असं माध्यम आहे की ज्यामुळे लोकांना संपत्ती खरेदी करणे सोप झाले आहे. कर्ज मिळण्यासाठी ज्या अनेक अडचणी येतात त्या यामुळे दूर होऊ शकतात. अर्जदार आणि बँका या दोघांनाही लोन घेणे आणि लोन देणे हे सोपे होत आहे. 

Related posts: