|Thursday, November 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तेणें श्रीरंग वेधिला

तेणें श्रीरंग वेधिला 

भीमकीच्या सौंदर्याचे वर्णन करताना एकनाथ महाराज पुढे म्हणतात-

मुक्त नाव मुक्तफळा । नेणती मुक्तीचा जिव्हाळा ।

म्हणोन पडली भीमकीगळां । भेटी गोपाळा माळ जाली । पूर्वी क्षीरसिंधुची बाळा । नेसली क्षीरोदक पाटोळा । ना तो पाहावया घनसांवळा । कांसे लागला क्षीराब्धी । माझी कन्या हे गोरटी । झणीं कोणाची लागेल दृष्टी । म्हणोनि घातलीसे कंठीं । रत्नमाला क्षीराब्धी । प्रकृतिपुरुषां पडली मिठी । तैसें बिरडें कांचोळीये दाटी । कृष्ण सोडील जगजेठी । आया बायां न सुटेचि । शमदमांची सुभटें । हस्तकडगे बहुवटें । करिं कंकणें उद्भटें । कृष्णनि÷s रुणझुणती ।

क्षणक्षणां दिशा उजळे । तैसीं शोभती दशांगुळें ।

दशावतारांचिये लीळें । जडित कीळें मुद्रिका ।

पाहातां तळहाताच्या रंगा । उणें आणिलें संध्यारागा ।

करी चरणसेवा श्रीरंगा । तळवा तळहातीं सदा । 

आटूनिया हेमकळा । आटणी आटिल्या बारा सोळा ।

वोतीव केली कटिमेखळा । मघ्यें घननीळा जडियेलें । दोहींकडे मुक्तलग । तेणें शोभत मध्यभाग ।

भीमकी भाग्याची सभाग्य । तेणें श्रीरंग वेधिला । 

चरणी गर्जती नूपुरें । वांकी आंदुवाचेनि गजरें ।

झालें कामासी चेइरें । धनुष्य पुरें वाइलें । मुक्त लोकांनासुद्धा ईश्वर प्राप्त न झाल्याने ते मोत्याच्या माळेत जाऊन कृष्णभेटीसाठी रुक्मिणीच्या गळय़ात विराजमान झाले होते. समुद्रसुद्धा कृष्णदर्शनासाठी नीलवस्त्राच्या रुपाने भीमकीच्या अंगावर प्रकटला होता. लक्ष्मी ही समुद्राची कन्या आणि रुक्मिणी ही लक्ष्मीचाच अवतार असल्याने समुद्राने, माझ्या गोऱया गोमटय़ा कन्येला दृष्ट लागू नये म्हणून तिच्या गळय़ात रत्नमाला घातली होती. प्रकृतीची पुरुषाला मिठी पडावी तशी चोळी व काचोळी दाटली होती. ही जीवाची व शिवाची मिठी एका कृष्णावाचून कोण सोडविणार? हे येरा गबाळय़ाचे काम नाही. रुक्मिणीच्या हातातील कडी, बाहुवरील बाजुबंद म्हणजे शम, दम होते. हातातील बांगडय़ा कृष्णाचे नामस्मरण करीत रुणझुणत होत्या. क्षणाक्षणाला उजळणाऱया दिशाप्रमाणे तिची दहा बोटे शोभत होती. त्यात दशावताराच्या लीला सांगणाऱया दहा अंगठय़ा होत्या. रुक्मिणीचे तळहात पहावेत तर संध्याकाळच्या आकाशातील रंग त्यापुढे फिके वाटत होते. या हातांनीच तिने लक्ष्मी रुपात श्रीरंगाची चरणसेवा केली होती. सोने आटवून तिची मेखला तयार केली होती व त्यात कृष्णासारखा घननील मणी जडविला होता. त्याच्या दोन्ही बाजूला मोती जडविले होते. त्यामुळे कटि प्रदेश अधिकच शोभत होता. रुक्मिणी किती भाग्यवान! तिने कृष्णाला सुद्धा वेध लावले! रुक्मिणीच्या पायी नुपुरे, वाक्मया वाजत होत्या. त्या आवाजाने मदनाला चेव आला व त्याने आपले धनुष्य सज्ज केले.

कृष्ण धरूनिया चित्तीं । भीमकी चालतसे हंसगती ।

चैद्य मागध पाहाती । मदनें ख्याती थोर केली ।

कृष्ण हृदयात धरून रुक्मिणी हंसगतीने चालली होती. चैद्य, मागध तिच्याकडे पाहतच राहिले. इतक्मयात मदनाने कमाल केली.

Related posts: