|Thursday, December 12, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सर्व राज्यांना सतर्कतेचा निर्देश

सर्व राज्यांना सतर्कतेचा निर्देश 

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना अयोध्या भूमी वादाप्रकरणी संभाव्य निर्णयापूर्वी मार्गदर्शक सूचना देत सतर्क राहण्यास सांगितले आहे. तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या प्रकरणाच्या निर्णयापूर्वी दक्षतेची पावले उचलली आहेत.  अतिरिक्त सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाने निमलष्करी दलाच्या 40 तुकडय़ा उत्तरप्रदेशात पाठविल्या आहेत. तर अयोध्येत प्रशासनाने 10 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू केले आहे.

 सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोतून अयोध्या जिल्हय़ाला तीन शेणींमध्ये विभागण्यात आले आहे. सामान्य, संवेदनशील आणि अतिसंवेदनशील या शेणींनुसार बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सर्व क्षेत्रांमध्ये पोलिसांसह न्यायदंडाधिकारीही तैनात असणार आहेत. अयोध्या शहराच्या देखरेखीसाठी सद्यकाळात ड्रोनची मदत घेतली जात आहे.

अयोध्या अत्यंत संवेदनशील प्रकरण असल्याने उत्तरप्रदे सरकारने उपद्रव घडवून आणू शकणाऱया घटकांना रोखण्यासाठी तात्पुरते तुरुंग उभारले आहेत. तात्पुरत्या तुरुंगांना सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा योजनेत सामील करण्यात आले आहे. अयोध्येत स्थानिक प्रशासनाने अनेक शांतता समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांचे सदस्य गावागावांमध्ये जाऊन लोकांना शांतता तसेच सौहार्द राखण्याचे आवाहन करत आहेत.

झारखंडमध्येही अतिदक्षता

अयोध्या प्रकरणी निर्णय तसेच विधानसभा निवडणूक पाहता झारखंडमध्येही विशेष खबरदारी घेतली जात आहे. राज्यातील अनेक भागांसह पूर्व सिंहभूम जिल्हय़ात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. लोकांना सतर्क राहण्याचा आणि अफवेवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

अनावश्यक विधाने टाळा

अयोध्या प्रकरणी 17 नोव्हेंबरपूर्वी कुठल्याही दिनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. या प्रकरणी अनावश्यक तसेच वादग्रस्त विधाने करू नका. मंत्र्यांनी स्वतःच्या मतदारसंघात जात लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करावे असा निर्देश पंतप्रधानांनी दिला आहे.

संघाकडून चर्चेस प्रारंभ

अयोध्या निर्णयापूर्वी डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, सप अणि राजदसह अन्य पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतला आहे. याचबरोबर संघ मुस्लीम खासदार-आमदारांशी संवाद साधणार आहे. 5 नोव्हेंबर रोजी संघ आणि भाजप नेत्यांनी अनेक मुस्लीम नेत्यांची भेट घेत चर्चा केली होती.

विहिंपचे सर्व कार्यक्रम रद्द

राम मंदिरासाठी दगडांवर कलाकुसरीचे सुरू असलेले काम रोखण्यात आले आहे. 1990 नंतर पहिल्यांदाच हे काम थांबविण्यात आल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते शरद शर्मा यांनी दिली आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विहिंपने सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

16 हजार स्वयंसेवक तैनात

अयोध्या पोलिसांनी समाज माध्यमांवर कुठल्याही प्रकारचा दुष्प्रचार किंवा समुदायाच्या विरोधात प्रक्षोभक टिप्पणी रोखण्यासाठी जिल्हय़ात एकूण 16 हजार स्वयंसेवक तैनात केले आहेत. प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. निर्णयाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त स्थळानजीक राहणारे लोक घरांमध्ये धान्याचा साठा करत आहेत. निर्णयामुळे जनजीवनावर प्रतिकूल प्रभाव पडणार नसल्याचा विश्वास त्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अनुज कुमार यांनी दिली आहे.

Related posts: