|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » आसामच्या जंगलांमध्ये ‘लादेन’ची दहशत

आसामच्या जंगलांमध्ये ‘लादेन’ची दहशत 

गुवाहाटी  / वृत्तसंस्था :

ओसामा बिन लादेन या दहशतवाद्याला अमेरिकेच्या कमांडोंनी 8 वर्षांपूर्वी ठार केले असले तरीही आजही त्याचे नाव आसाममध्ये दहशत निर्माण करते. मागील आठवडय़ात आसामच्या गोलापारा जिल्हय़ात सर्वांच्या तोंडातून ‘लादेन पकडला गेला का’ हाच एक प्रश्न बाहेर पडत होता. हा लादेन एक रानटी हत्ती असून गोलापारा येथे एका रात्री त्याने 5 जणांचा जीव घेतला आहे.

या रानटी हत्तीचा 8 वनाधिकारी शोध घेत असून ड्रोनच्या मदतीने सतबारी अभयारण्याचा प्रत्येक भाग तपासला जात आहे. लादेनच्या हल्ल्यात आणखीन लोक बळी पडण्यापूर्वीच त्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देत ताब्यात घेण्याची योजना आहे. पण या सर्व मोहिमेदरम्यान आसामच्या नागरिकांची झोप उडाली आहे.

57 जणांचा यंदा मृत्यू

वन विभागानुसार यंदाच्या वर्षी रानटी हत्तींच्या हल्ल्यांमध्ये 57 जण मारले गेले आहेत. यंदा जुलै महिन्यात पर्यावरण आणि वन मंत्रालयाने लोकसभेत आकडेवारी मांडताना आसाममध्ये हत्तींच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱयांच्या संख्येत वृद्धी झाल्याचे नमूद केले होते.

2006 मध्ये ‘लादेन’ नामकरण

आसामच्या गावांमध्ये दहशत असल्यानेच शेतात धाव घेणाऱया तसेच हल्ला करणाऱया प्रत्येक रानटी हत्तीला ‘लादेन’ म्हटले जात आहे. 2006 मध्ये सोनितपूर जिल्हय़ात एका रानटी हत्तीने 12 जणांना ठार केल्यावर त्याला ‘लादेन’ म्हटले जाऊ लागले होते. त्याच कालावधीत दहशतवादी बिन लादेनही चर्चेत होता. मागील वर्षाच्या अखेरीस लादेन नावाचा हत्ती मारला गेला होता.

प्रत्येक जिल्हय़ाचा स्वतःचा लादेन

लादेन हे नाव पडल्याने रानटी हत्तींकडून झालेल्या नुकसानीची चर्चा लोकांमध्ये तसेच प्रसारमाध्यमांतून होऊ लागली आणि अधिकाऱयांचे याकडे लक्ष वेधले गेले. पण तेव्हापासून प्रत्येक जिल्हय़ाचा स्वतःचा एक ‘लादेन’ आहे. एकाला मारण्यात आल्यावर त्याची जागा दुसरा हत्ती घेत आहे. गोलापारामध्ये 2016-18 या कालावधीत आणखी एक लादेन वीजेच्या धक्क्यामुळे मृत्युमुखी पडला आहे. या हत्तीने 40 जणांचा जीव घेतल्याचे बोलले जात होते.

Related posts: