|Thursday, February 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मित्राचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मासेवाडीच्या युवकाचा खून

मित्राचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मासेवाडीच्या युवकाचा खून 

प्रतिनिधी /आजरा :

मुलीच्या प्रेमसंबंधातून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी मित्राचे भांडण सोडविण्यास गेलेल्या मासेवाडी येथील अभिषेक जयवंत सावर्डे (वय 23) या युवकाचा खून झाला. तर मित्र हरिष विराप्पा तोरगले जखमी झाला. उत्तूर फाटय़ापासून काही अंतरावर असलेल्या साबुदाणा फॅक्टरीसमोर उत्तूर रोड लगत गुरूवार दि. 7 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबतची फिर्याद हरिष तोरगले याने पोलीसात दिली असून याप्रकरणी पवन अडकूरकर (रा. घाटकरवाडी, ता. आजरा) याच्यासह अनोळखी 12 जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

याबाबत ग्रामस्थ व पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, मासेवाडीच्या सध्या मुंबईत स्थायिक असलेल्या एका युवतीसोबत हरिषचे प्रेमसंबंध होते. त्याच मुलीसोबत पवन अडकूरकर याचेही प्रेमसंबंध होते. या प्रेमाचे त्रिकोणातून गेले काही दिवस हरिष व पवन यांच्यामध्ये वाद होता. नोकरीनिमित्त मुंबई येथे असणारा हरिष दिवाळीनिमित्त गावी आला होता. तर कोल्हापूर येथे शिक्षण घेत असलेला पवनही दिवाळी सुट्टीसाठी गावी आला होता. याच दरम्यान हरिष व पवन यांच्यात वाद होऊन त्यातून गुरूवारची घटना घडली.

आजरा-उत्तूर मार्गावर गुरूवारी दुपारी हरिष आपले साथीदार घेऊन आला त्याच ठिकाणी पवनही आपले साथीदार घेऊन आला. सुरूवातील वाद झाल्यानंतर पवनच्या कोल्हापूर येथून आलेल्या साथीदाराने हरिषवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला. यावेळी मित्राला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या अभिषेकवर आरोपींनी चाकू व चॉपरने वार केले. यामध्ये अभिषेक जागीच ठार झाला. रस्त्यालगत रक्ताच्या थारोळय़ात अभिषेक पडताच मारेकऱयांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनास्थळी गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अंगद जाधवर यांनी भेट देऊन पहाणी केली. रात्री उशिरापर्यंत त्यांनी आजरा पोलीस ठाण्यात थांबून तपासाबाबत मार्गदर्शन केले. 

या प्रकरणी गुरूवारी रात्री पोलीसांनी घाटकरवाडी, भटवाडी, दर्डेवाडी येथून काही युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून प्रमुख आरोपींच्या शोधासाठी पोलीसांची पथके रवाना झाली आहेत. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या युवकांना घटनास्थळी नेण्यात आले होते. घटनास्थळावरून काही साहित्यही पोलीसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी पवन अडकूरकरसह अनोळखी 12 जणांविरोधात खूनाचा गुन्हा नेंदविण्यात आला असून पुढील तपास आजऱयाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी भांगे करीत आहेत. 

Related posts: