|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » साळशिंगेनजीक युवकाचा खून

साळशिंगेनजीक युवकाचा खून 

प्रतिनिधी /विटा :

खानापूर तालुक्यातील साळशिंगेनजीक युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. बुधवार, सहा नोव्हेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास जखमी अवस्थेत आढळलेल्या युवकाला दवाखान्यात करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. बालाजी किसन करांडे (27, रा. सागर भेंडवडे, ता. खानापूर) असे मयत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी मयताचे वडील किसन यशवंत करांडे यांनी वर्दी दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सागर भेंडवडे येथील बालाजी करांडे यांचे विटय़ात मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे. दररोज तो गावातून येऊन-जाऊन करीत होता. बुधवारी रात्री साळशिंगे परिसरातील ओढय़ाजवळ एक तरुण गाडीवरून पडल्याचा निरोप भेंडवडे येथील ग्रामस्थांना एका प्रवासी महिलेने दिला. गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता, सागर भेंडवडे येथील बालाजी करांडे हा तरूण रस्त्याकडेला जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले.

जखमी बालाजी याला ग्रामस्थांनी तातडीने विटय़ातील खासगी रुग्णालयात दाखल केले. याबाबत माहिती मिळताच बालाची वडील किसन करांडे यांनी विटय़ातील दवाखान्यात धाव घेतली. रात्री उशिरा 10.45 वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना बालाजीचा मृत्यू झाला. बालाजीच्या उजव्या हातावर आणि पाठीवर जखमा होत्या. शिवाय बरगडीमध्ये धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्याचे किसन करांडे यांनी वर्दीत म्हटले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. बरकडीत झालेला वार खोल होता, असे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.

वार करून रस्त्याकडेला सोडले

बालाजी याचे विटा येथे खानापूर रस्त्यावर साई मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. बुधवारी बालाजी नेहमीप्रमाणे आपली मोबाईल शॉपी बंद करून विटय़ातून आपल्या गावी भेंडवडेकडे निघाला होता. साळशिंगे येथे त्याच्यावर खुनी हल्ला करून त्याला जखमी अवस्थेत रस्त्याकडेला गाडीसोबत सोडून देण्यात आले होते. या ठिकाणी मोठा रक्तस्त्राव झाल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: